Rohit Sharma Team India Plan, Aus vs Ind 4th Test at MCG: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटी २६ डिसेंबरपासून मेलबर्न येथे खेळली जाणार आहे. या महत्त्वाच्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाने आपली प्लेइंग इलेव्हन आधीच जाहीर केली आहे. टीम इंडियाकडून मॅचमध्ये खेळणाऱ्या ११ खेळाडूंची नावे अद्याप समोर आलेली नाहीत. पण कर्णधार रोहित शर्माचे या सामन्यासाठी वेगळा प्लॅन आखत असल्याचे समजते. WTC फायनलच्या दृष्टिकोनातून हा सामना भारताला कोणत्याही परिस्थितीत जिंकणे आवश्यक आहे आणि त्यासाठी रोहितने दोन खास प्लॅन आखल्याचे सांगितले जात आहे.
रोहितची पुन्हा जुन्या भूमिकेत दिसण्याची शक्यता
रोहित शर्मा पर्थ कसोटीत उपस्थित नव्हता. त्यावेळी केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल या जोडीने अप्रतिम फलंदाजी केली. त्यामुळे संघात पुनरागमन करताना रोहितने ओपनिंगमध्ये कोणताही बदल केला नाही. तो स्वतः सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसला. मात्र गेल्या दोन सामन्यांमध्ये त्याची कामगिरी अत्यंत खराब आहे. त्याला ३ डावांत ६.३३ च्या सरासरीने केवळ १९ धावा करता आल्या आहेत. त्यामुळे आता तुलनेने फलंदाजीला पोषक असलेल्या मेलबर्नमधील खेळपट्टीवर रोहित पुन्हा आपल्या मूळ सलामीच्या स्थानी खेळताना दिसू शकतो असे बोलले जात आहे. टीओआयच्या वृत्तानुसार, रोहित आणि यशस्वी ओपनिंग करतील. राहुलला तिसऱ्या स्थानी खेळवले जाऊ शकते. मात्र शुभमन गिलची संघात भूमिका काय असेल याची कल्पना देण्यात आलेली नाही.
टीम इंडियाची दुहेरी फिरकी
मेलबर्नच्या मैदानावर फिरकीपटूंना खूप मदत मिळते. चौथ्या आणि पाचव्या दिवशी त्यांची भूमिका खूप महत्त्वाची ठरते. खेळपट्टी जुनी झाल्यानंतर स्पिनर्स फलंदाजांवर वर्चस्व गाजवतात. रिपोर्टनुसार, याचा विचार करता कर्णधार रोहित शर्मा दोन फिरकीपटूंना मैदानात उतरवू शकतो. रवींद्र जाडेजासोबत वॉशिंग्टन सुंदरलाही प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते. सुंदरला संघात घेताना त्याच्या जागी नितीश कुमार रेड्डीला संघाबाहेर बसवले जाऊ शकते.