Rohit Sharma Fitness viral photo: भारताचा 'हिटमॅन' सध्या क्रिकेटपासून दूर आहे. पण लवकरच तो पुन्हा एकदा टीम इंडियाच्या जर्सीमध्ये दिसणार आहे. रोहित शर्मा सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुनरागमनाच्या तयारीसाठी त्याच्या फिटनेसवर जोरदार मेहनत घेत आहे. आगामी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी तो पुन्हा भारतीय संघात दिसणार आहे. या महत्त्वाच्या मालिकेपूर्वी त्याने आपले वजन तब्बल १० किलोने कमी केले आहे. हे वृत्त समोर आल्यानंतर क्रिकेट वर्तुळात त्याच्या फिटनेसची आणि जिद्दीची चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.
रोहित शर्माचा फिटनेस प्रशिक्षक आणि भारताचा माजी सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर याने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे. नायरने फोटोसोबत "१०,००० ग्रॅम (कमी झाल्या)नंतर... आम्ही प्रयत्न सुरूच ठेवू" असे लिहिले आहे. या पोस्टमुळे रोहितच्या जबरदस्त फिटनेसची चांगलीच चर्चा रंगली आहे.
See Rohit Sharma's Fitness Viral Photo:
![]()
३८ वर्षीय रोहित शर्माने आयपीएल २०२५ नंतर एकही क्रिकेट सामना खेळलेला नाही. त्याने यापूर्वीच कसोटी आणि टी२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहेत. आता तो फक्त एकदिवसीय क्रिकेटच खेळताना दिसणार आहे. पण बराच खेळ कुठलीही स्पर्धा न खेळून, सध्या तो ICCच्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे त्याची कामगिरी किती उत्तम आहे हे स्पष्ट समजू शकते.
रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघेही ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेद्वारे भारतीय संघात परत येण्याची शक्यता आहे. या मालिकेतील कामगिरीवर दोन्ही खेळाडूंचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील भविष्य अवलंबून आहे. रोहितने निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम देत फिटनेसवर लक्ष केंद्रित केले आहे, ज्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.