Join us

ऋतुजानं सुवर्ण जिंकणं हा राज्यासाठी अभिमानाचा क्षण; सुप्रिया सुळेंकडून महाराष्ट्राच्या लेकीचं अभिनंदन

Rohan Bopanna & Rutuja Bhosale win Gold medal in Mixed Doubles : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय शिलेदारांचा सुपर शो सुरूच आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2023 15:49 IST

Open in App

Asian Games 2023 : सध्या चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राची लेक ऋतुजा भोसलेने सुवर्ण कामगिरी करत तिरंग्याची शान वाढवली. रोहन बोपण्णा आणि ऋतुजा भोसले या जोडीने मिश्र दुहेरीत सुवर्ण पदक जिंकले. भारतीय जोडीने अंतिम फेरीत तैपेई जोडीचा २-६, ६-३, १०-४ असा पराभव करत सोनेरी कामगिरी केली. सुरूवातीला पिछाडीवर असलेल्या भारतीय जोडीने जोरदार पुनरागमन केले. रोहन आणि ऋतुजा यांनी मिश्र दुहेरी स्पर्धेत पहिला सेट सोडल्यानंतर उल्लेखनीय पुनरागमन करत विजयावर शिक्कामोर्तब केला. खरं तर ऋतुजाचे हे पहिले आशियाई खेळातील पदक आहे तर रोहन बोपण्णा २ वेळा आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेता ठरला. ऋतुजा भोसले ही मूळची महाराष्ट्रातील असून राज्याच्या लेकीचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील ऋतुजाचे अभिनंदन केले. सोशल मीडियावर एक पोस्ट करत त्यांनी म्हटले, "ऋतुजा भोसले आणि रोहन बोपण्णा यांचे खूप खूप अभिनंदन. आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ मध्ये त्यांनी टेनिस मिश्र दुहेरी स्पर्धेत अविश्वसनीय विजय मिळवला. हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे, फक्त आपल्या सर्वांसाठीच नाही तर विशेषत: महाराष्ट्रासाठी कारण ऋतुजा ही आपल्या राज्यातील आहे. हे सुवर्ण पदक तुमच्या मेहनतीचा आणि प्रतिभेचा दाखला देणारे आहे."

चीनमधील हांगझोऊ शहरात आशियाई क्रीडा स्पर्धेचा थरार रंगला आहे. १९व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत शनिवारी भारताची सुरूवात सुवर्ण पदकाने झाली. टेनिसमध्ये साकेथ मिनेनी आणि रामनाथन रामकुमार यांच्या रौप्य पदकानंतर मिश्र दुहेरीत रोहन बोपण्णा आणि ऋतुजा भोसले या जोडीने सोनेरी कामगिरी केली. 

भारतीय शिलेदारांचा डंका दरम्यान,आशियाई स्पर्धेच्या यंदाच्या पर्वातील भारताचे हे नववे सुवर्ण पदक ठरले आहे, तर भारताने एकूण ३५ पदके जिंकली आहेत. रोहन बोपण्णा आणि ऋतुजा भोसले या जोडीने एन शो लिआंग आणि संग हाओ हुआंग यांचा पराभव करून देशासाठी या खेळांमध्ये नववे सुवर्ण जिंकले. भारताची सुरुवात चांगली झाली नव्हती. कारण भारताला पहिल्या सेटमध्ये २-६ ने पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर भारतीय जोडीने शानदार पुनरागमन केले. दुसरा सेट भारतीय जोडीने जिंकला आणि तिसरा सेट टायब्रेकरवर पोहोचला. यासह भारताने हा सामना टायब्रेकरमध्ये १०-४ अशा फरकाने जिंकून देशाला सुवर्ण पदक मिळवून दिले.

टॅग्स :आशियाई स्पर्धा २०२३भारतसुवर्ण पदकखासदारसुप्रिया सुळेमहाराष्ट्र