Join us
Daily Top 2Weekly Top 5

जेमिमा, स्मृतीची कामगिरी लै भारी, महाराष्ट्राच्या कन्यांची आयसीसी क्रमवारीत भरारी

भारतीय महिला संघातील खेळाडू जेमिमा रॉड्रीग्ज आणि स्मृती मानधना यांनी आयसीसी ट्वेंटी-10 क्रिकेटपटूंच्या क्रमवारीत भरारी घेतली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2019 12:51 IST

Open in App

दुबई : भारतीय महिला संघातील खेळाडू जेमिमा रॉड्रीग्ज आणि स्मृती मानधना यांनी आयसीसी ट्वेंटी-10 क्रिकेटपटूंच्या क्रमवारीत भरारी घेतली आहे. भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेत 0-3 असा पराभव पत्करावा लागला असला तरी महाराष्ट्रांच्या कन्यांनी सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. वेस्ट इंडीजची अष्टपैलू खेळाडू डिंड्रा डॉटिनने अव्वल स्थान पटकावले आहे. जेमिमाने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत 132 धावा चोपल्या आणि त्यामुळेच चार स्थानांच्या सुधारणेसह क्रमवारीत दुसरे स्थान पटकावले आहे. गेल्या आठवड्यात वन डे क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणाऱ्या स्मृतीने या मालिकेत 180 धावा चोपल्या. तिनेही चार स्थानांच्या सुधारणेसह सहाव्या क्रमांकावर झेप घेतली आहे.  स्मृतीने या मालिकेत दोन अर्धशतकी खेळी केल्या.  भारताची फिरकीपटू  राधा यादवने अव्वल दहामध्ये प्रवेश केला आहे. तिने किवींविरुद्ध चार विकेट घेतल्या होत्या आणि त्यामुळे ती 18 स्थानांनी वर सरकली आहे. दीप्ती शर्मा 14व्या स्थानी पोहोचली आहे.  न्यूझीलंडच्या सोफी डेव्हीनने भारताविरुद्ध 153 धाव कुटल्या आणि तिच्या ( 8 ) क्रमवारीत तीन स्थानांची सुधारणा झाली. कर्णधार अॅमी सॅटरवेटनेही 23वरून 17व्या स्थानी झेप घेतली. गोलंदाजीत ली ताहूहू पाच स्थानांच्या सुधारणेसह 11 व्या स्थानावर आली आहे. वेस्ट इंडीजच्या डॉटीनने अष्टपैलू खेळाडूंमध्ये अव्वल स्थान पटकावले. तिने पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत 158 धावा व 3 विकेट्स घेतल्या.  संघांच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर कायम आहे, तर न्यूझीलंडने इंग्लंडकडून दुसरे स्थान हिसकावून घेतले. वेस्ट इंडिज आणि भारत अनुक्रमे चौथ्या व पाचव्या स्थानावर आहेत. 

टॅग्स :भारतीय महिला क्रिकेट संघआयसीसीजेमिमा रॉड्रिग्ज