Rishabh Pant on Rohit Sharma rested Ind vs Aus 5th Test: पाचव्या कसोटीत पहिल्या दिवसअखेर भारताचा डाव संपून ऑस्ट्रेलियाने ९ धावांच्या मोबदल्यात एक बळी गमावला. प्रथम फलंदाजी करताना भारताचा (Team India) डाव १८५ धावांवर आटोपला. भारताकडून रिषभ पंतने सर्वाधिक ४० धावा तर रवींद्र जाडेजाने झुंजार २६ धावांची खेळी केली. शेवटच्या टप्प्यात कर्णधार जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) केलेल्या २२ धावांमुळे भारताने कशीबशी १८५ धावांपर्यंत मजल मारली. फॉर्मात नसलेल्या रोहित शर्माला नियमित कर्णधार असूनही संघाबाहेर ठेवण्यात आले. तसे करूनही भारतीय फलंदाजांना छाप पाडता आली नाही. दिवसाचा खेळ संपल्यानंतर रिषभ पंतने पत्रकार परिषदेत रोहितबद्दलच्या प्रश्नाला उत्तर दिले. त्याने हा निर्णय काहीसा 'भावनिक' (Emotional) असल्याचे सांगितले.
काय म्हणाला पंत?
"रोहित शर्माला संघातून वगळण्याचा निर्णय हा नक्कीच कठीण होता. आमच्यासाठीही हा निर्णय काहीसा भावनिक स्वरूपाचा होता. कारण रोहित भाई खूप काळापासून आमच्या संघाचा कर्णधार आहे. रोहित हा खरंच एक उत्तम लीडर आहे तो एक चांगला कर्णधार देखील आहे पण काही वेळेला असे काही निर्णय होतात ज्यात तुमच्या समावेश नसतो. असे निर्णय खेळाडूंच्या हातात नसतात. त्याला संघातून वगळण्याचा निर्णय हा संघ व्यवस्थापनाने घेतला आहे. त्यात आमच्या सहभागाचा काहीही संबंध नव्हता," अशा शब्दांत त्याने भावना मांडल्या.
रोहितने खरंच स्वतः बाहेर राहण्याचा निर्णय घेतला?
या कसोटीसाठी भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा याला संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. रोहितने स्वत:च सामन्यातून माघार घेतल्याची माहिती देण्यात आली. पण दुखापतग्रस्त नसताना एखाद्या संघाच्या नियमित कर्णधारालाच संघाबाहेर बसण्याची वेळ येणे ही क्रिकेटवर्तुळात नक्कीच चर्चेची बाब आहे. रोहितने गेल्या ३ कसोटीतील ५ डावांत ३१ धावा केल्या होत्या, त्यामुळे त्याला सक्तीची विश्रांती देण्यात आली असावी, अशीही चर्चा रंगली आहे.
पंतच्या खेळीत दिसला बदल
मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, स्कॉट बोलंड आणि पदार्पणवीर ब्यू विबस्टर या चार वेगवान ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना सळो की पळो करून सोडले होते. अनुभवी खेळाडूंपासून ते नवख्यापर्यंत कुणीही फार काळ खेळपट्टीवर तग धरू शकले नाही. पण रिषभ पंतने मात्र आपला नैसर्गिक आक्रमक खेळ न करता अतिशय बचावात्मक खेळ करून दाखवला. त्याने ९८ चेंडूंचा सामना केला. त्यात त्याने केवळ ३ चौकार आणि १ षटकार मारला. इतर सर्व चेंडूंवर त्याने बचाव करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात आज पंतला अनेकदा वेगवान चेंडू अंगावर लागला. बाऊन्सर चेंडू खेळताना दोन वेळा त्याच्या हेल्मेटवर चेंडू आदळला. एक दोन वेळा मांड्याजवळ चेंडू लागला. इतकेच नव्हे तर मिचेल स्टार्कचा एक चेंडूत त्याच्या दंडावर लागला, त्यावेळी तो कळवळला, चेंडू लागल्याने त्याचे रक्तदेखील गोठले, पण त्याने हार मानली नाही. तो खेळतच राहिला. त्याचा हा संघर्ष पाहून अनेकांना चेतेश्वर पुजाराचीही आठवण झाली.