Rinku Sigh Ransom Threat: भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज रिंकू सिंह याला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाने १० कोटी रुपयांच्या खंडणीसाठी धमकीचा फोन आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे क्रिडाविश्वात मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांनी तातडीने कारवाई करत नौशाद नावाच्या एका व्यक्तीला अटक केली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, प्रसिद्ध क्रिकेटपटू रिंकू सिंह याला एका अज्ञात नंबरवरून फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने आपण डी-कंपनीचा गुंड असल्याचे सांगत, रिंकू सिंगकडे तब्बल १० कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. ही रक्कम न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही देण्यात आली. यामुळे रिंकू सिंहने तात्काळ पोलिसांशी संपर्क साधून अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली.
पोलिसांची वेगवान कारवाई
सायबर सेल आणि गुन्हे शाखेच्या मदतीने पोलिसांनी धमकी आलेल्या फोन नंबरचा माग काढला. या तपासात नौशाद नावाच्या व्यक्तीचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी विलंब न लावता नौशादला ताब्यात घेतले आहे. त्याची कसून चौकशी सुरू असून, यामागे आणखी कोण आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत. नौशादचे डी-कंपनीशी नेमके काय संबंध आहेत, याचाही तपास केला जात आहे.
या घटनेमुळे भारतीय क्रिकेटपटूंच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एका उदयोन्मुख आणि लोकप्रिय खेळाडूला थेट अंडरवर्ल्डकडून धमकी आल्याने संपूर्ण क्रिडाविश्व चिंतेत आहे.