Ricky Ponting slams BCCI, Ind vs Eng 1st ODI : भारतीय संघाने टी२० मालिकेपाठोपाठच वनडे मालिकेतही विजयी सुरुवात केली. इंग्लंड विरुद्ध नागपूरमध्ये झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात भारताने चार गडी आणि ६८ चेंडू राखून सहज विजय मिळवला. इंग्लंडच्या संघाकडून कर्णधार जॉस बटलरने ५२ तर जेकब बेथेलने ५१ धावा करत संघाला २४८ धावांपर्यंत मजल मारून दिली. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून शुभमन गिल याने ८७, श्रेयस अय्यरने ( Shreyas Iyer ) ५९ तर अक्षर पटेलने ५२ धावा करत संघाला सहज सोपा विजय मिळवून दिला. भारतीय संघ विजयी होऊनही ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टींग टीम इंडियाच्या सिलेक्टर्सवर नाराज असल्याचे दिसून आले.
काय म्हणाला पॉन्टींग?
भारतीय संघाच्या मधल्या फळीने कमाल केली. सलामीवीर फ्लॉफ ठरल्यावर आणि विराटच्या अनुपस्थितीत गिल, अय्यर, अक्षरने चांगली झुंज दिली. पण श्रेयस अय्यरला केवळ विराटच्या दुखापतीमुळे संघात स्थान मिळाले होते. त्या गोष्टीवर पॉन्टींगने नाराजी व्यक्त केली. "गेल्या दोन वर्षांत श्रेयस अय्यरला भारतीय संघातून बाहेर बसवण्यात आलं ही गोष्टच माझ्यासाठी थोडीशी आश्चर्यकारक आहे. २०२३च्या वर्ल्ड कप मध्ये त्याने दमदार खेळी केल्या, मधल्या फळीत भारतासाठी तो एक उत्तम फलंदाज ठरला होता. त्याने केलेली कामगिरी पाहता त्याची संघातील जागा निश्चित आहे असं मला वाटत, होतं कारण त्यांनी ती कष्टाने मिळवली होती. पण नंतर एक दोन वेळा तो दुखापतग्रस्त झाला. पाठीच्या दुखापतीमुळे त्याला संघाबाहेर व्हावे लागले. मग त्याने देशांतर्गत स्पर्धा खेळली आणि तेथे देखील त्याने उत्तम कामगिरी करून स्वतःला सिद्ध केले. IPL Auction पासून तर त्याचा खेळ अधिकच बहरला आहे. आणि आजही त्याला चुकून मिळालेल्या संधीचं त्याने सोनं करून दाखवलं," अशा भावना पॉन्टींगने व्यक्त केल्या.
दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर फिल सॉल्ट (४३) आणि बेन डकेट (३२) हे चांगले खेळले. त्यानंतर कर्णधार जोस बटलर (५२) आणि जेकब बेथेल (५१) यांनीही अर्धशतके ठोकून संघाला मोठ्या धावसंख्येकडे नेण्याचा प्रयत्न केला. पण खालच्या फळीत जोफ्रा आर्चरने केलेल्या २१ धावांच्या मदतीने इंग्लंडला २४८ धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताकडून शुबमन गिलने दमदार अर्धशतक ठोकले. त्याने १४ चौकारांसह सर्वाधिक ८७ धावा केल्या. श्रेयस अय्यरने ३६ चेंडूत झटपट ५९ धावा कुटल्या. तर अक्षर पटेलने ५२ धावांची संयमित खेळी केली. या तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने ३८.४ षटकांतच सामना जिंकला.