Join us

Ricky Ponting, Champions Trophy : "चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये 'हे' दोन संघ खेळताना दिसतील"; रिकी पॉन्टींगची भविष्यवाणी

Ricky Ponting, Champions Trophy : दोन संघांव्यतिरिक्त एक अनपेक्षित संघांचंही घेतलं नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 12:34 IST

Open in App

Ricky Ponting, Champions Trophy : बहुप्रतिक्षित चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसा आता अवघे १५ दिवस शिल्लक आहे. या स्पर्धेसाठी ८ तगडे संघ मैदानात उतरणार आहेत. भारत आणि पाकिस्तान एकाच गटात असणार आहेत. या सामन्याची सर्वत्र वाट पाहिली जात आहे. या स्पर्धेआधी ऑस्ट्रेलिया संघाला मोठा धक्का बसला आहे. स्टार ऑलराऊंडर मिचेल मार्श दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर झाला आहे. असे असले तरीही ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टींग याने मात्र आपल्या फेव्हरिट संघांमध्ये ऑस्ट्रेलियाची निवड केली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेची फायनल कोणत्या दोन संघात होईल याबाबत त्याने भविष्यवाणी केली आहे. तसेच, त्याने तिसऱ्या एका संघाबद्दलही मोठा दावा केला आहे.

काय म्हणाला पॉन्टींग?

ICC च्या एका शो मध्ये पॉन्टींग म्हणाला, "स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया या संघांना पराभूत करून पुढे जाणं इतर संघांसाठी खूपच कठीण असेल. सध्या या दोन संघांमध्ये असलेल्या खेळाडूंचा दर्जा पाहिला की आपोआपच त्याचा अंदाज येतो. ICC च्या गेल्या काही स्पर्धांमधील या दोन संघांची कामगिरी पाहा. दोनही संघांनी आपली छाप पाडली आहे आणि संपूर्ण जगाला आपला दर्जा दाखवून दिला आहे. बड्या स्पर्धांमध्ये फायनलच्या सामन्यात या दोघांपैकी एकाने कायमच आपलं स्थान राखलं आहे. त्यामुळे हे दोन संघ चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल खेळतील."

एका अनपेक्षित संघाबाबतही केला मोठा दावा

"भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांच्या व्यतिरिक्त आणखी एक संघही चांगली कामगिरी करतोय. सध्याच्या घडीला पाकिस्तानी संघ आपल्या कामगिरीच्या माध्यमातून प्रभाव पाडतोय. त्यांचा वनडे क्रिकेटमधला खेळाचा दर्जा नक्कीच सुधारलाय असं आपण म्हणू शकतो. गेल्या काही मालिकांमध्ये त्यांनी अप्रतिम कामगिरी केलीय. बड्या स्पर्धांमध्ये पाकिस्तानची कामगिरी कशी होईल याची काहीच खात्री नसते. पण ते दमदार कामगिरी करण्याची क्षमता राखतात. गेल्या वर्षभरात त्यांनी त्यांच्या संघाची बलस्थानं आणि उणीवा नीट समजून घेतल्यात आणि उत्तम कामगिरी केलीय," असेही पॉन्टींग म्हणाला.

टॅग्स :चॅम्पियन्स ट्रॉफीआॅस्ट्रेलियाभारतीय क्रिकेट संघपाकिस्तान