England Former Captain Nasser Hussain Big Prediction About Jemimah Rodrigues :क्रिकेटच्या मैदानात एक काळ गाजवणारा इंग्लंडचा माजी कर्णधार सोशल मीडियावरील बडबडीमुळे चर्चेत असतो. भारतीय क्रिकेट आणि खेळाडूंसंदर्भात अनेकदा तिखट प्रतिक्रिया दिल्यामुळे या क्रिकेटर अनेकदा ट्रोलही झाला आहे. आता या इंग्लिश क्रिकेटरची भारताची 'रन'रागिणी जेमिमा रॉड्रिग्ससंदर्भातील एक पोस्ट चर्चेत आली आहे. कोण आहे तो क्रिकेटर अन् ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाच्या विजयाची नायिका ठरलेल्या जेमी संदर्भात तो कधी आणि नेमकं काय म्हणाला होता? जाणून घेऊयात सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कधी IPLवरून BCCI वर निशाणा साधताना दिसला, तर कधी कोहलीवर भाष्य करत स्वतःच ट्रोल झाला
तो इंग्लिश क्रिकेटर म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून तो आहे नासिर हुसेन. खरंतर या माजी क्रिकेटरनं मांडलेले मत आणि अंदाज अनेकदा भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये संतापाची लाट निर्माण करणारा ठरला आहे. कधी त्याने आयपीएलनं कसोटी क्रिकेटची वाट लागली म्हणत BCCI च्या अंडे देणाऱ्या कोंबडीवर (IPL) निशाणा साधला. भारतीय संघातील खेळाडू घरच्या मैदानावर शेर तर परदेशात ढेर होणार आहेत, असे म्हणत त्याने टीम इंडियाला डिवचल्याचे पाहायला मिळाले आहे. कोहलीच्या आक्रमक अंदाजावर व्यक्त होताना त्याला स्वत:वर नियंत्रण ठेवता येत नाही, असे भाष्य करत त्याने कोहलीच्या चाहत्यांना अंगावर घेतल्याचेही पाहायला मिळाले आहे. एकंदरीत काय तर तो बोलला की, भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या निशाण्यावर आला, असे काहीसे चित्र सातत्याने पाहायला मिळाले आहे. वासिम जाफर आणि नासिर हुसेन यांच्यातील जुगलबंदी तर चांगलीच गाजताना दिसते. पण आता तिखट प्रतिक्रियेमुळे ट्रोल होणाऱ्या क्रिकेटरचं महिला क्रिकेटरसंदर्भातील गोड ट्विट व्हायरल होताना दिसत आहे.
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
आता जेमिमा रॉड्रिग्जसंदर्भातील पोस्ट चर्चेत
आता नासिर हुसेन याने सात वर्षांपूर्वी जेमिमा रॉड्रिग्जसंदर्भातील शेअर केलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे. आयसीसीच्या अधिकृत एक्स अकाउंटवरूनही त्याची जुनी पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये इंग्लंडच्या क्रिकेटरनं जेमिमासोबतचा एक खास फोटो शेअर केला होता. ही पोस्ट शेअर करताना त्याने लिहिलं होतं की, "हे नाव लक्षात ठेवा… जेमिमा रॉड्रिग्ज. आज तिच्यासोबत थोडं थ्रो-डाउन केलं. ही मुलगी भारतासाठी एक मोठी स्टार होईल.” महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत जेमिमा रॉड्रिग्जनं दमदार शतक झळकावत टीम इंडियाला फायनलमध्ये प्रवेश मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शतकी खेळीने जेमिमाला ‘स्टार’वरून थेट ‘सुपरस्टार’ केलं आहे.