अंतिम फेरी गाठणे हेच मोठे यश; आठवण १९८३ च्या विश्वचषकाची

आता ही अंतिम लढतही भारतीय संघ जिंकणार का, हे रविवारीच कळेल. 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2023 08:30 AM2023-11-19T08:30:14+5:302023-11-19T08:31:52+5:30

whatsapp join usJoin us
Reaching the finals is a huge achievement; Remembering the 1983 World Cup | अंतिम फेरी गाठणे हेच मोठे यश; आठवण १९८३ च्या विश्वचषकाची

अंतिम फेरी गाठणे हेच मोठे यश; आठवण १९८३ च्या विश्वचषकाची

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

अयाझ मेमन

पहिला विश्वचषक भारताने जिंकला १९८३मध्ये. त्यानंतर भारतीय संघ २००३मध्ये अंतिम फेरीत पोहोचला तर २०११मध्ये विजेता ठरला. यंदा २०२३मध्येही भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. आता ही अंतिम लढतही भारतीय संघ जिंकणार का, हे रविवारीच कळेल. 

१९८३मध्ये स्पर्धा सुरू होण्याआधी आणि भारताच्या विश्वविजयानंतर काय वातावरण होतं ते मी तुम्हाला सांगणार आहे. कारण १९८३मध्ये जेव्हा भारताने जगज्जेतेपदाची लढत जिंकली तेव्हा मी इंग्लंडमध्येच होतो. तेव्हाचे वातावरण आतापेक्षा पूर्ण वेगळे होते. कारण २०२३मध्ये भारतीय संघाला विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. त्यानुसार भारतीय संघाने अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम फेरीत पाचवेळा जगज्जेत्या तगड्या ऑस्ट्रेलिया संघाचे भारतासमोर आव्हान असेल. त्यामुळे कोणता तरी दुबळा संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे, असं नाही; पण १९८३चा विचार केला तर भारताचा संघ फारच दुय्यम मानला जात होता. भारतासमोर तगड्या वेस्ट इंडिज संघाचे आव्हान होते. अनेक महान खेळाडूंचा भरणा असलेल्या विंडीजने दोनवेळा जगज्जेतेपद पटकाविले होते. कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाकडून विजयाची कोणतीही अपेक्षा नव्हती. झिम्बाब्वेविरुद्ध कपिल यांनी १७५ धावांची शानदार खेळी केल्यानंतर क्रिकेट चाहत्यांचा आनंद शब्दांत मांडता येणार नाही असाच होता. कपिल देव यांच्यामुळे भारतीय चाहत्यांना आशेचा किरण दिसू लागला होता. त्यानंतर प्रत्येक सामन्यानंतर उत्साहात भर पडत गेली. चेम्सफर्डमध्ये ऑस्ट्रेलियाला नमविले. त्यानंतर भारताने उपांत्य फेरीत इंग्लंडला पराभूत केले. भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचल्यामुळे इंग्लंडमधील भारतीय चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण होते. अंतिम लढतीपर्यंतचा काळ स्वप्नवत असाच होता. यावेळी भारतीय चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात पार्ट्या करून हा आनंद साजरा केला. आताही उत्साह तसाच आहे; पण आता खेळाडूंवर बरीच बंधने आली आहेत. १९८३मध्ये खेळाडूंवर कोणतीही बंधने नव्हती. त्यामुळे आम्ही खेळाडूंसोबत सहज गप्पा मारायचो. पार्ट्यांना गेल्यावर कपिल देव यांच्यासह सर्वच भारतीय खेळाडूंना आम्ही भेटत होतो.

दडपण न घेता नैसर्गिक कामगिरीवर भर द्यावा
१९८३मध्ये भारतीय संघाकडे गमावण्यासारखे काहीही नव्हते; मात्र आता तसे नाही. विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आणि घरच्या मैदानावर खेळत असल्यामुळे भारतीय संघावर दडपण असेल. त्यामुळे भारतीय संघाने दबाव दूर करण्याचा प्रयत्न करायला हवा. जर हा अंतिम सामना आहे, आपल्यासमोर स्टार्क, हेजलवूड, स्मिथ, वाॅर्नर आहेत असा विचार केला तर भारतीय संघावर दडपण आणखी वाढेल. संघाने आतापर्यंत नैसर्गिक कामगिरी केली आहे. रोहित शानदार सुरुवात करीत आहे. त्यानंतर आलेले गोलंदाज प्रभावी कामगिरी करीत आहेत. दोन फिरकीपटू कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा हेदेखील शानदार फॉर्मात आहेत. त्यामुळे हे सर्व पाहता भारतीय संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदार ठरतो. 

(लेखक लोकमत समूहाचे कन्सल्टिंग एडिटर, आहेत)

Web Title: Reaching the finals is a huge achievement; Remembering the 1983 World Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.