Join us

"जेव्हा देशाचे पंतप्रधान ड्रेसिंग रूमला भेट देतात तेव्हा...", रवी शास्त्रींची 'मन की बात'

narendra modi visited indian dressing room : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील भारतीय ड्रेसिंग रूमला भेट देऊन खेळाडूंना धीर देण्याचा प्रयत्न केला. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 17:12 IST

Open in App

नवी दिल्ली : विश्वचषकासारख्या मोठ्या व्यासपीठाच्या अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर विविध क्षेत्रातील दिग्गजांनी टीम इंडियाला धीर दिला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील भारतीय ड्रेसिंग रूमला भेट देऊन खेळाडूंना धीर देण्याचा प्रयत्न केला. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामना खेळवला गेला. बलाढ्य ऑस्ट्रेलियाने यजमानांचा पराभव करत सहाव्यांदा विश्वचषक उंचावला. नरेंद्र मोदींनी सामना पाहायला उपस्थिती दर्शवल्यानंतर विरोधकांनी सत्ताधारी भाजपाला लक्ष्य केले. 

दरम्यान, मोदींनी भारताच्या ड्रेसिंग रूमला भेट दिल्यानंतर टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी समाधान व्यक्त केले. तसेच अशावेळी देशाचे पंतप्रधान खेळाडूंना धीर देतात, त्यांच्या पाठिशी उभे राहतात ही खूप मोठी गोष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले. शास्त्री एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलत होते. 

रवी शास्त्री म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय खेळाडूंची भेट घेतली ही एक मोठी बाब आहे. कारण मला माहित आहे की, अशावेळी ड्रेसिंग रूममध्ये कशी स्थिती असते. मी देखील त्या ड्रेसिंग रूमचा भाग राहिलो आहे. भारताचा प्रशिक्षक म्हणून सात वर्षांहून अधिक वर्षे आणि एक क्रिकेटपटू म्हणून अनेक वर्षे मी तिथे होतो. हा भावनिक क्षण असतो जेव्हा संघ महत्त्वाचा सामना गमावतो."

तसेच जेव्हा देशाच्या पंतप्रधानांसारखा कोणीतरी येतो आणि ड्रेसिंग रूमला भेट देतो यामागे काहीतरी मोठे कारण असते. पंतप्रधानांच्या भेटीमुळे खेळाडूंचा उत्साह वाढला. कारण ही कोणी सामान्य व्यक्ती नाही. जेव्हा देशाचे पंतप्रधान ड्रेसिंग रूममध्ये फिरतात हे विशेष असते. मला माहित आहे की, खेळाडू कोणत्या परिस्थितीत असतील... मी जर आताच्या घडीला संघाचा प्रशिक्षक असतो तर मी देखील याच स्थितीत असतो, असेही शास्त्रींनी सांगितले. 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियानरेंद्र मोदीरवी शास्त्रीभारतीय क्रिकेट संघ