ठळक मुद्देवडिलांना श्रद्धांजली देण्यासाठी रशिद खान सोमवारी मैदानावर उतरला.2018 मध्ये सर्वाधिक 96 विकेट घेण्याचा केला विक्रम
सिडनी : अफगाणिस्तानचा फिरकीपटू रशिद खानच्या वडिलांचे रविवारी निधन झाले. मात्र, त्याने बिग बॅश लीगमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला. वडिलांना श्रद्धांजली देण्यासाठीच आपण खेळणार असल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे अॅडलेड स्ट्रायकर्सचे प्रतिनिधित्व करणारा रशिद सोमवारी सिडनी थंडर्सविरुद्ध मैदानावर उतरला. संघानेही या सामन्यात विजय मिळवून रशिदच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली.
बिग बॅश लीगमध्ये दुसरा हंगाम खेळणाऱ्या रशिदने इंस्टाग्रामवर पोस्ट केली होती की,''आज मी आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या व्यक्तीला माझ्या वडिलांना गमावले. ते मला नेहमी सांगायचे स्वतःला खचू देऊ नकोस, त्यांच्या त्या सल्ल्याचा अर्थ आता उमगला. आज मी पोरका झालो. तुमची आठवण येत राहिल.'' पण, वडिलांना श्रद्धांजली देण्यासाठी सोमवारी तो खेळला. त्याच्या या निर्णयाला क्रीडा प्रेमींनी सलाम ठोकला.
रशिदने या सामन्यात दोन विकेट घेत ट्वेंटी-20त एक पराक्रमी कामगिरी केली. 2018 मध्ये ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक 96 विकेट्स त्याने नावावर केल्या. त्याने अवघ्या 61 सामन्यांत ही कामगिरी केली. याआधी हा विक्रम वेस्ट इंडिजच्या ड्वॅन ब्राव्होच्या ( 87 विकेट, 72 सामने ) याच्या नावावर होता. 2017 मध्ये रशिद हा विक्रम मोडण्याच्या जवळपास आला होता. 2017 मध्ये त्याने 56 सामन्यांत 80 विकेट घेतल्या होत्या.