नवी दिल्ली : अफगाणिस्तानच्या ट्वेंटी-20 संघाच्या कर्णधारपदी फिरकीपटू राशिद खानची वर्णी लागली आहे. ट्वेंटी-20 विश्वचषकानंतर तत्कालीन कर्णधार मोहम्मद नबी पायउतार झाल्यानंतर त्याच्या जागी राशिद खानकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मिरवाईस अश्रफ यांनी ट्वेंटी-20 फॉरमॅटसाठी अफगाणिस्तान राष्ट्रीय संघाचा कर्णधार म्हणून राशिद खानची नियुक्ती करण्याची इच्छा व्यक्त केली होती.
"राशिद खान अफगाणिस्तान क्रिकेटमधील एक मोठे नाव आहे. त्याच्याकडे जगभरात सर्व फॉरमॅट खेळण्याचा प्रचंड अनुभव आहे ज्यामुळे तो संघाला फॉरमॅटमध्ये एका नवीन स्तरावर नेण्यात मदत करेल", असे मिरवाईस अश्रफ यांनी म्हटले. तसेच राशिद खानला याआधी तिन्ही फॉरमॅटमध्ये अफगाणिस्तानचे नेतृत्व करण्याचा अनुभव आहे आणि त्याला पुन्हा एकदा ट्वेंटी-20 फॉरमॅटसाठी संघाचे कर्णधारपद मिळाल्याने आम्हाला आनंद होत आहे. मला खात्री आहे की तो संघाला अव्वल स्थानावर नेईल आणि देशाचा अधिक गौरव होईल, असे अश्रफ यांनी आणखी म्हटले.
राशिद खानची कर्णधारपदी निवड राशिद खानने आतापर्यंत 74 ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अफगाणिस्तानचे नेतृत्व केले. खरं तर कर्णधार म्हणून टीम साऊदी (134) आणि शाकिब अल हसन (128) यांच्या पाठोपाठ सर्वाधिक बळी घेणारा राशिद तिसरा गोलंदाज ठरला आहे. 2015 पासून जगभरातील 15 वेगवेगळ्या संघांसाठी राशिदने तब्बल 361 ट्वेंटी-20 सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर एकूण 491 बळींची नोंद आहे. जगभरातील विविध फ्रँचायझीमध्ये खेळताना सर्वाधिक बळी घेण्याच्या यादीत राशिद दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर 641 बळींसह वेस्ट इंडिजचा ड्वेन ब्राव्हो या यादीत अव्वल स्थानी आहे. अफगाणिस्तानचा संघ फेब्रुवारीमध्ये UAE दौऱ्यावर जाणार आहे, जिथे ते तीन ट्वेंटी-20 सामन्यांची मालिका होणार आहे. 2019 नंतर अफगाणिस्तानचा कर्णधार म्हणून राशिद खानचा हा पहिलाच दौरा असेल.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"