रणजी ट्रॉफी २०२४-२५ च्या यंदाच्या हंगामातील दुसऱ्या सेमीफायनलमध्ये विदर्भ संघानं मुंबईकरांना अक्षरश: खिंडीत पकडलं आहे. पहिल्यांदा बॅटिंग करताना विदर्भ संघानं आधी बॅटिंगचा तोरा दाखवला. त्यांनी पहिल्या डावात ३८३ धावा केल्या. मग मुंबईचा संघ बॅटिंगला आल्यावर पार्थ रेखाडेनं मुंबईकरांना नाचवलं. विदर्भ संघाच्या ताफ्यातील या फिरकीपटूनं मुंबई संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे १८ (२४), सूर्यकुमार यादव ०(२) आणि शिवम दुबे ०(२) या तिघांची विकेट घेतली. त्यामुळे तो चांगलाच चर्चेत आलाय. इथं जाणून घेऊयात कोण आहे पार्थ रेखाडे? कशी आहे त्याची देशांतर्गत क्रिकेटमधील कारकिर्द?
एकाच ओव्हरमध्ये तीन विकेट्स घेत विदर्भ संघाकडून वळवला सामना
विदर्भ संघाच्या ताफ्यातील पार्थ हा २५ वर्षीय युवा खेळाडू लेफ्ट आर्म स्पिनर आहे. मुंबईच्या ४१ व्या डावात तो गोलंदाजीला आला. त्याने पहिल्या चेंडूवर आधी अजिंक्य रहाणेची विकेट घेतली. त्यानंतर जागा घेण्यासाठी आलेल्या सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबेचा त्याने प्रत्येकी दोन चेंडूत खेळ खल्लास केला. एकाच षटकात त्याने तिन्ही विकेट घेत सामना विदर्भ संघाच्या बाजूनं वळवला.
दुसऱ्या फर्स्ट क्लास मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी
युवा स्पिनर पार्थ रेखाडे आपल्या कारकिर्दीतील दुसरा प्रथम श्रेणी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. याआधीच्या सामन्यात त्याला पदार्पणाची संधी देण्यात आली. त्यावेळी त्याने ५४ धावांसह ४ विकेट घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. पार्थ रेखाडे याने ८ लिस्ट ए मॅचेस खेळल्या आहेत. यातत्याच्या खात्यात ९ विकेट जमा आहेत.
पार्थच्या पाच अप्रतिम चेंडूमुळे मुंबई संघ सापडला अडचणीत
पार्थ रेखाडे याने एकाच षटकातील पाच चेंडूत मुंबईला धक्क्यावर धक्के दिल्यामुळे विदर्भ संघ सेमीत भक्कम स्थितीत पोहचला आहे. दुसरीकडे मुंबईच्या संघाच टेन्शनव वाढलं आहे. विदर्भ संघाने दिलेल्या ३८३ धावांचा पाठलाग करताना मुंबईच्या संघानं पहिल्या डावात १८८ धावांतच ७ विकेट गमावल्या आहेत. तिसऱ्या दिवशी मुंबईचा संघासमोर आघाडी कमी करून मॅचमध्ये कमबॅक करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.