पुणे : रणजी चषक क्रिकेट स्पर्धेच्या या मोसमातील पहिल्याच सामन्यात यजमान महाराष्ट्राने गतविजेत्या विदर्भाची वाताहत करताना त्यांच्यावर फॉलोआॅन लादला. गुरूवारी, दुसºया दिवसअखेर विदर्भाने दुसºया डावात बिनबाद ४६ धावा केल्या असून हा संघ पहिल्या डावात अद्याप १७७ धावांनी मागे आहे.
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर इलिट ‘अ’ गटातील ही लढत सुरू आहे. पहिल्या डावात ३४३ धावा करणाºया महाराष्ट्राने विदर्भाला अवघ्या १२० धावांत गुंडाळून त्यांना फॉलोआॅन पत्करायला भाग पाडले. महाराष्ट्राच्या वेगवान तसेच फिरकी माºयासमोर विदर्भाचे स्टार फलंदाज ढेपाळले. फिरकीपटू सत्यजीत बच्छावने ५ षटकांमध्ये अवघ्या ३ धावांत ३ तर, अनुपम संकलेचा, समद फल्ला आणि निकीत धुमाळ या मध्यमगती गोलंदाजांनी २ बळी घेत दिवस गाजविला. उर्वरित १ बळी चिराग खुराणाने घेतला. दुसºया दिवसखेर विदर्भाने १७ षटकांत बिनबाद ४६ असे सावध प्रत्युत्तर दिले. कर्णधार फै झ फझल २० तर संजय रामास्वामी २५ धावांवर खेळत होते.
तत्पूर्वी, ६ बाद २८४ वरून पुढे खेळणाºया महाराष्ट्राचा पहिला डाव ३४३ धावांत आटोपला. आक्रमक फलंदाज राहुल त्रिपाठीने नैसर्गिक खेळ करीत अर्धशतक पूर्ण केले. त्याने ७१ चेंडूंत ७३ धावा करताना १ षटकार आणि १३ चौकार लगावले. यानंतर ११ धावांच्या अंतराने महाराष्ट्राचा डाव आटोपला. विदर्भातर्फे आदित्य सरवटे व ललित यादव यांनी प्रत्येकी ३ तर, अक्षय वखरेने २ गडी बाद केले.
प्रत्युत्तरात, विदर्भाच्या फलंदाजांना अजिबातही सूर गवसला नाही. वसीम जाफरने सर्वाधिक २७ तर आदित्य सरवटेने २५ धावा केल्याने पाहुण्यांना पहिल्या डावात सव्वाशेच्या घरात धावा करता आल्या. विदर्भाची सलामी जोडी ३४ धावांत परतली. फझलला (८) धुमाळने तर, संजयला (९) संकलेचाने बाद केले. कसोटीवीर वसीम जाफरचा त्रिफळा उद्ध्वस्त करणाºया समद फल्लाने पुढच्याच चेंडूवर अक्षय वाडकरचा शून्यावर त्रिफळा उडवून विदर्भाची अवस्था ५ बाद ५५ अशी वाईट केली. समदची हॅट्ट्रिक मात्र पूर्ण होऊ शकली नाही.
अपूर्व वानखडे-आदित्य सरवटे यांनी सहाव्या गड्यासाठी ३३ धावा जोडून संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. हे दोघे फलंदाजी करीत असताना विदर्भ १४३ धावांचा टप्पा सहजपणे ओलांडून फॉलोआॅन टाळेल, असे वाटत होते. वानखडेला (१३) संकलेचाने बाद केल्यानंतर सत्यजीत बच्छावने आपल्या लागोपाठच्या षटकांत दर्शन नळकांडे (८), आदित्य सरवटे (२५) व अक्षय वखरे (२) यांना अवघ्या ३ धावांच्या मोबदल्यात बाद करून विदर्भाचा फॉलोआॅन निश्चित केला.
संक्षिप्त धावफलक
महाराष्ट्र : पहिला डाव : १०५.५ षटकांत सर्व बाद ३४३ (चिराग खुराणा ८९, राहुल तिपाठी ७३, ऋतुराज गायकवाड ४७, स्वप्नील गुगळे ४७, नौशाद शेख ४०, आदित्य सरवटे ३/५१, ललित यादव ३/८४, अक्षय वखरे २/४८, आदित्य ठाकरे १/३१).
विदर्भ : पहिला डाव : ४४.५ षटकांत सर्व बाद १२० (वसीम जाफर २७, आदित्य सरवटे २५, सत्यजीत बच्छाव ३/३, समद फल्ला २/२१, अनुपम संकलेचा २/३८, निकीत धुमाळ २/४८, चिराग खुराणा १/६).
विदर्भ : दुसरा डाव : १७ षटकांत बिनबाद ४६ (रामास्वामी खेळत आहे २५, फै झ फझल खेळत आहे २०).