Join us

Ranji Trophy : विदर्भ इज चॅम्पियन! फायनल मॅच ड्रॉ; केरळच्या पदरी निराशा

पहिल्या डावातील अल्प आघाडीच्या जोरावर विदर्भ संघानं तिसऱ्यांदा उंचावली ट्रॉफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 14:43 IST

Open in App

देशांतर्गत क्रिकेटमधील प्रतिष्ठित रणजी करंडक स्पर्धेतील विदर्भ विरुद्ध केरळ यांच्यातील नागपूरच्या विदर्भ क्रिकेट स्टेडियमवर रंगलेला अंतिम सामना अनिर्णित राहिला. या सामन्यातील पहिल्या डावात घेतलेल्या ३७ धावांच्या अल्प आघाडीच्या जोरावर विदर्भ संघानं यंदाच्या हंगामात आपल्या नावे केला आहे. एका बाजूला विदर्भ संघानं तिसऱ्यांदा रणजी ट्रॉफी स्पर्धा जिंकली. दुसरीकडे पहिल्यांदा फायनलमध्ये पोहचलेल्या सचिन बेबीच्या नेतृत्वाखालील केरळ संघावर निराश होण्याची वेळ आलीये. गत रणजी करंडक हंगामात विदर्भ विरुद्ध मुंबई यांच्यात फायनल पाहायला मिळाली होती. त्यावेळी विदर्भच्या पदरी निराशा आली होती. पण पुन्हा जोमाने कामगिरी करून दाखवत एकही सामना न गमावता यंदा विदर्भ संघानं रणजी ट्रॉफी जिंकली आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

अल्प आघाडीच्या जोरावर विदर्भ संघानं तिसऱ्यांदा उंचावली रणजी ट्रॉफी

पहिल्यांदा फायनल खेळणाऱ्या केरळ संघानं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. विदर्भ संघानं पहिल्या डावात दानिश मालेवार (Danish Malewar)१५३ (२८५) याने केलेल्या दमदार शतकाशिवाय करुण नायरच्या १८८ चेंडूतील ८६ धावांच्या खेळीच्या जोरावर पहिल्या डावात सर्व बाद ३७९ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना केरळचा कर्णधार सतिन बेबीनं ९८ धावांची खेळी केली.  त्याच्याशिवाय सरवाटेनं ७९ धावांचे योगदान दिले. त्यामुळे केरळच्या संघानं आपल्या पहिल्या डावात ३४२ धावा केल्या होत्या. पहिल्या डावानंतर विदर्भ संघाला ३७ धावांची आघाडी मिळाली होती. ही आघाडी त्यांना तिसऱ्यांदा जेतेपद पटकवण्याच्या कामी आली.

दोन्ही डावांत या दोघांच्या दमदार खेळीच्या जोरावर विदर्भ संघानं मारली बाजी

पहिल्या डावात ८६ धावांची दमदार खेळी केल्यावर रनआउट झालेल्या करुण नायर याने अंतिम सामन्यातील दुसऱ्या डावात शतकी डाव साधला. त्याने २९५ चेंडूत १३५ धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय पहिल्या डावात शतक साजरे करणाऱअया दानिश मलेवारनं दुसऱ्या डावात १६२ चेंडूत ७३ धावा केल्या. दोन्ही डावात दोघांच्या दमदार खेळीच्या जोरावरच विदर्भ संघाने तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्याचा डाव साधला. दुसरीकडे ही जोडी केरळ संघाच्या पहिल्यांदा जेतेपद मिळवण्याच्या वाटेत आडवी आली. 

टॅग्स :रणजी करंडकविदर्भकेरळनागपूर