Join us

IND vs SA 2nd Test: आता पंतचं काही खरं नाही! कोच राहुल द्रविडने पत्रकारांसमोरच...

भारताच्या पराभवाचं एक कारण म्हणजे तिसऱ्या डावातील सुमार दर्जाची फलंदाजी. ऋषभ पंतच्या बेजबाबदार फटक्याची तर जोरदार चर्चा रंगली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 10:27 IST

Open in App

India vs South Africa 2nd Test: विराट कोहलीच्या अनुपस्थितीत केएल राहुलने दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाचे नेतृत्व केले. सामन्याचा निकाल चौथ्याच दिवशी लागला आणि भारताला पहिल्यांदाच जोहान्सबर्गच्या मैदानावर पराभवाचे तोंड पाहावे लागले. आफ्रिकेला दिलेले २४० धावांचे आव्हान त्यांनी सात गडी राखून पार केले. भारतीय गोलंदाजांना चौथ्या डावात फारशी चमक दाखवता आली नाही. त्यामुळे संघ पराभूत झाला. भारताच्या पराभवाला आणखी एक गोष्ट कारणीभूत ठरली ती म्हणजे तिसऱ्या डावातील खराब फलंदाजी. ऋषभ पंतने लगावलेला फटका हे तर बेजबाबदारपणाचं उत्तम उदाहरण असल्याचं चाहते म्हणत होते. तशातच भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यानेही पत्रकारांसमोर ऋषभ पंतबद्दल काही सूचक विधाने केली.

ऋषभ पंत जेव्हा फलंदाजीस आला त्यावेळी भारतीय संघाला शांत आणि संयमी खेळीची गरज होती. पण आफ्रिकेच्या काही खेळाडूंशी त्याची तू तू मैं मैं झाली. त्यात त्याने विचित्र फटका खेळून आपली विकेट बहाल केली. याच मुद्द्यावर राहुल द्रविडने सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सडेतोड मत व्यक्त केलं.

"ऋषभ पंत हा सकारात्मक क्रिकेट खेळण्यात पटाईत आहे. झटपट धावा जमवण्यावर त्याचा विश्वास आहे. त्याची फलंदाजीची एक विशिष्ट शैली आहे. त्याच शैलीच्या जोरावर त्याने आतापर्यंत अनेक चांगल्या खेळी केल्या आहेत. पण नेहमी तसा खेळ योग्य नसल्याने मी लवकरच त्याच्याशी संवाद साधणार आहे. त्याची फलंदाजी चुकीची नाहीये, पण फटका खेळण्याची वेळ चुकतेय. त्याबद्दल त्याच्याशी बोलणं आवश्यक आहे अन् ते मी लवकरच करेन", असं स्पष्ट शब्दात द्रविडने पत्रकार परिषदेत सांगितलं.

"सकारात्मक खेळ करू नको किंवा आक्रमक खेळ करू नको असं ऋषभ पंतला कोणीही सांगणार नाहीये. पण काही वेळा जो फटका आपण खेळणार आहोत, त्याची गणितं नक्की कशी आहेत, ते लक्षात घेतलं पाहिजे. फटक्याची निवड आणि तो खेळण्याची वेळ दोन्ही गोष्टींचं फलंदाजाला भान हवं", असंही द्रविड म्हणाला.

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाराहुल द्रविडरिषभ पंतविराट कोहली
Open in App