Join us
Daily Top 2Weekly Top 5

'स्ट्राईक'वर राहुल द्रविड, 'नॉन स्ट्राईक'वर व्हीव्हीएस लक्ष्मण... एकेकाळचे 'तारणहार' भारतीय क्रिकेट पुन्हा सावरणार!

आज तिशी-चाळीशीत असलेल्या क्रिकेटप्रेमी तरुणांच्या आशा पल्लवित झाल्यात. कारण, त्यांच्या मनाच्या कोपऱ्यातले दोन 'आयडॉल' पुन्हा क्रिकेट मैदानात उतरले आहेत. ते म्हणजे, 'मिस्टर परफेक्शनिस्ट' राहुल द्रविड आणि व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण!

By अमेय गोगटे | Updated: November 23, 2021 15:11 IST

Open in App

>> अमेय गोगटे

'द वॉल' म्हणून जगात ओळखल्या जाणाऱ्या राहुल द्रविडची निवड टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून झाली आणि आज तिशी-पस्तीशीत असणाऱ्या पिढीचा दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला. त्यानंतर, आता भारताने न्यूझीलंडविरुद्धची टी-२० मालिका जिंकल्याने टीम इंडिया आणि द्रविडसोबत त्याच्या चाहत्यांचाही आत्मविश्वास दुणावला आहे.  

क्रिकेटमधील 'स्वॅग', फिक्सिंगचा डाग, कामाचा व्याप अशा कारणांमुळे सचिन - सौरव - द्रविड - लक्ष्मणचं क्रिकेट बघत मोठे झालेली तरुणांई क्रिकेटपासून थोडी दुरावलीय. स्कोअर काय झाला रे?, अशी चौकशी ते आजही करतील, पण आधीसारखं क्रिकेट आता राहिलं नाही, असा सूरही ऐकू येतोच. अर्थात, हे प्रत्येक पिढीच्या बाबतीत होतं. 'जुनं ते सोनं' म्हणतात ते उगीच नाही. आपल्या पिढीच्या 'आयकॉन्स'साठी प्रत्येकाच्या मनात हक्काचा, हळवा कोपरा असतोच. म्हणूनच, आज तिशी-चाळीशीत असलेल्या क्रिकेटप्रेमी तरुणांच्या आशा पल्लवित झाल्यात. कारण, त्यांच्या मनाच्या कोपऱ्यातले दोन 'आयडॉल' पुन्हा क्रिकेट मैदानात उतरले आहेत. ते म्हणजे, 'मिस्टर परफेक्शनिस्ट' राहुल द्रविड आणि व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण! 

द्रविडनं टीम इंडियाचा 'हेड कोच' म्हणून सूत्रं स्वीकारली आहेत, तर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रमुखपदाची धुरा व्हीव्हीएसकडे देण्यात आलीय. त्यामुळे, टीम इंडियाचं वर्तमान आणि भविष्य अत्यंत सक्षम, सुरक्षित हातांमध्ये असल्यासारखं वाटू लागलंय. राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांची क्रिकेट कारकीर्द जबरदस्त आहे, भारतीय क्रिकेटमधील त्यांचं योगदानही मोठं आहे, पण त्याहीपेक्षा ते माणूस मोठे आहेत. 

१४ मार्च २००१... कोलकात्याचं ईडन गार्डन्स मैदान... ऑस्ट्रेलियासारखा बलाढ्य संघ... त्यांचे तगडे गोलंदाज... भारतावर लादलेला 'फॉलो ऑन'... त्यानंतर, २५४/४ अशा स्थितीत असलेली टीम इंडिया... कांगारुंना फुटलेल्या आनंदाच्या उकळ्या... पण, त्यांच्या स्वप्नांना सुरुंग लावणारे दोन शिलेदार... द्रविड आणि लक्ष्मण... अख्खा दिवस हे दोघं न डगमगता लढले, भिडले.... दिवसअखेर भारताची धावसंख्या होती ५८९/४... लक्ष्मण नाबाद २७५ आणि द्रविड नाबाद १५५... भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सोनेरी अक्षरांत नोंदवला गेलेला दिवस... त्या आठवणीने क्रिकेटप्रेमींचा ऊर आजही अभिमानाने भरून येतो... 

क्रिकेटपटू म्हणून द्रविड-लक्ष्मणची ताकद या आणि अशा कितीतरी खेळींमधून सिद्ध झालीय... त्याशिवाय, खेळावरची निष्ठा, ध्यास, अभ्यास, विनम्रता, शांत स्वभाव, जमिनीवर पाय, वादांपासून चार हात दूर राहण्याची हातोटी, 'मॅन मॅनेजमेंट' हे गुण या दोघांच्या ठायी आहेत आणि म्हणूनच नवे क्रिकेटपटू घडवण्याची जबाबदारीही ते समर्थपणे पेलतील, याबद्दल खात्री वाटते. 

राष्ट्रीय क्रिकेट अकादमी ही एक प्रकारे हिऱ्यांना पैलू पाडणारी 'फॅक्टरी' आहे. देशभरात वेगवेगळ्या स्तरांवर उत्तम क्रिकेट खेळणारे हिरे इथे येतात. त्यांना टीम इंडियाचे तारे बनवण्याचं काम नॅशनल क्रिकेट अकॅडमीत होतं. थोडक्यात, भविष्यातील टीम इंडिया इथे घडते. त्यासोबतच, दुखापतग्रस्त खेळाडूंना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या 'फिट' करण्यातही अकॅडमी महत्त्वाची भूमिका बजावते. 

२०१९ मध्ये राहुल द्रविड या अकादमीचा संचालक म्हणून रुजू झाला होता. आता त्याची निवड टीम इंडियाचा 'हेड कोच' म्हणून करायचं ठरल्यानंतर, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीला अकादमीच्या प्रमुखपदी विश्वासू आणि सक्षम शिलेदार हवा होता. 'दादा'च्या डोळ्यांसमोर हक्काचा माणूस होता - व्हीव्हीएस लक्ष्मण. पण, त्याच्या काही व्यक्तिगत अडचणी होत्या. अखेर, सगळ्यातून मार्ग काढत, थोडा त्याग करत, आर्थिक नुकसानीचा विचार न करता, लक्ष्मणने होकार दिला आणि 'दादा'सह सगळ्यांनाच 'आपला माणूस' संचालक झाल्यासारखं वाटलं. ओल्या मातीला आकार देण्यासाठी, त्यांच्यावर संस्कार करण्यासाठी जो संयम लागतो, त्यांना समजून घेण्याचं आणि समजावण्याचं जे कसब लागतं ते लक्ष्मणकडे आहे. तंत्रशुद्धतेबद्दल तर शंकाच नाही. म्हणून, ही निवड योग्यच म्हणायला हवी.

दुसरीकडे, राहुल द्रविडने गेल्या तीन-चार वर्षांत प्रशिक्षक म्हणून स्वतःला सिद्ध केलं आहे. त्याच्याकडून 'गुरुमंत्र' घेऊन पृथ्वी शॉच्या शिलेदारांनी २०१८ मध्ये १९ वर्षाखालील वर्ल्ड कपवर नाव कोरलं होतं. त्यानंतर, नॅशनल क्रिकेट अकॅडमीमध्येही राहुलनं उदयोन्मुख खेळाडूंना मार्गदर्शन केलंय. त्यापैकी अनेक जण आज आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करत आहेत, टीम इंडियाचं दार ठोठावत आहेत. भारतीय संघाचं मुख्य प्रशिक्षकपद हे द्रविडसाठी पुढचं पाऊल आहे. कारण, इथे 'कोचिंग'पेक्षा त्याचं 'मॅन मॅनेजमेंट'चं कौशल्य निर्णायक ठरणार आहे.

प्रशिक्षकपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर, संघातील शिलेदारांना स्वतःहून संपर्क साधून, त्यांच्याशी गप्पा मारून, त्यांच्या मनावरचं दडपण दूर करून द्रविडनं आश्वासक सुरुवात केली. टीम इंडियात पदार्पण करणाऱ्या वीराला सीनिअर खेळाडूच्या हस्ते मानाची 'कॅप' देण्याची प्रथा पुन्हा सुरू करून संघात जोश भरला. स्वतः नेट्समध्ये उतरला, खेळपट्टीची पाहणी करायला विमानतळावरून थेट ईडन गार्डन्सवर पोहोचला, फिल्डिंग कोचची पाठ थोपटताना दिसला आणि मालिकाविजयानंतर मोजकंच हसला. कारण, ही फक्त सुरुवात आहे, याची पुरेपूर जाणीव त्याला आहे. प्लेईंग-11 निवडणं, मूड सांभाळणं, सगळ्यांची मनं जुळवणं आणि संघ बांधणं, हे आव्हान तो कसं पेलतो यावर पुढचं यशापयश ठरणार आहे. 

सामना आणि मनं जिंकण्यासाठी चांगलं क्रिकेट खेळता येणं महत्त्वाचं आहेच. टीम इंडियामध्ये ते सगळ्यांना येतंयही. पण, काही काळापासून संघभावना कुठेतरी हरवल्यासारखी वाटते, काहीतरी बिनसल्यासारखं वाटतं आणि अपेक्षित निकाल लागत नाही. ते कुणामुळे झालं, का झालं, कसं झालं, याचा विचार न करता, ते कसं संपवता येईल, हे पाहावं लागेल. ते संपल्यावरच खऱ्या अर्थाने भारतीय क्रिकेटचं नवं पर्व सुरू होईल. 

क्रिकेटला 'जंटलमन्स गेम' म्हटलं जातं. या खेळातले दोन 'जंटलमन' पुन्हा एकदा भारतीय क्रिकेटचे आधारस्तंभ झाले आहेत. त्यांचं काम ते चोख करतील, याबद्दल शंका नाही; फक्त ते त्यांना त्यांच्या पद्धतीने करू द्या, एवढीच बीसीसीआयकडून अपेक्षा आहे. तसं झालं तर, भारतीय क्रिकेटचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे!

टॅग्स :राहूल द्रविडसौरभ गांगुलीभारतीय क्रिकेट संघ
Open in App