Join us

'जंटलमन' राहुल द्रविडला BCCIची नोटीस; गांगुली, भज्जी यांनी घेतला समाचार

भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या क्रिकेट ऑपरेशन समितीचा प्रमुख म्हणून काम पाहत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 09:18 IST

Open in App

मुंबईः भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या क्रिकेट ऑपरेशन समितीचा प्रमुख म्हणून काम पाहत आहे. पण, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय) शिस्तपालन अधिकाऱ्याने हितसंबंध जपण्याचा आरोप लावत 'जंटलमन' द्रविडला नोटीस पाठवली आहे. मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे सदस्या संजीव गुप्ता यांच्या तक्रारीनंतर बीसीसीआयचे लोकपाल निवृत्त न्यायाधीश डी.के.जैन यांनी ही नोटीस पाठवली. 

गुप्ता यांनी केलेल्या तक्रारीनुसार द्रविड हा राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख आहे आणि शिवाय तो इंडिया सिमेंट ग्रुपचा उपाध्यक्ष आहे आणि इंडियन प्रीमिअर लीगमध्ये त्यांचा चेन्नई सुपर किंग्स संघ खेळत आहे. ''मागील आठवड्यात आम्ही राहुल द्रविड यांना नोटीस पाठवली आहे. हेतुसंबंध जपण्याच्या मुद्यावरून पाठवलेल्या नोटीशीला उत्तर देण्यासाठी द्रविडला दोन आठवड्यांचा कालावधी दिला आहे. त्याच्या उत्तरानंतर पुढील कारवाईची दिशा ठरेल,''असे जैन यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.

16 ऑगस्टपर्यंत द्रविडचं उत्तर अपेक्षित आहे आणि त्यानंतर त्याला कदाचित जैन यांच्यासमोर सुनावणीसाठी हजर रहावे लागू शकते. गुप्ता यांनीच सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या क्रिकेट सल्लागार समितीतील सहभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तेंडुलकर आणि लक्ष्मण हे दोघेही अनुक्रमे आयपीएलमधील मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघाचे मेंटॉर आहेत.  

बीसीसीआयच्या या निर्णयावर 'दादा' भडकलाद्रविडला नोटीस पाठवणाऱ्या बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीची माजी कर्णधार सौरव गांगुलीनं चांगलाच समाचार घेतला. तो म्हणाला,''भारतीय क्रिकेटमध्ये सध्या नवीन फॅशन आली आहे. तिचं नाव हेतुसंबंध जपणे असं आहे. चर्चेत राहण्याचा हा सर्वोत्तम मार्ग बनला आहे. देवच आता भारतीय क्रिकेटला वाचवू शकतो.'' 

गांगुलीच्या या टीकेनंतर भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगनेही बीसीसीआयचे कान टोचले. तो म्हणाला,''भारतीय क्रिकेटला राहुल द्रविडपेक्षा चांगला माणूस मिळू शकत नाही. अशा प्रकारे नोटीस पाठवणे म्हणजे हा त्याचा अपमान आहे. क्रिकेटला त्याची गरज आहे.'' 

टॅग्स :राहूल द्रविडबीसीसीआयसौरभ गांगुलीहरभजन सिंग