राहुल द्रविड ( Rahul Dravid) याची टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड ही अंतिम टप्प्यात आली असून आता केवळ औपचारिकता बाकी आहे. बीसीसीआयनं टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी रविवारी अर्ज मागवले आहेत. बीसीसीआयनं टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासह, फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षक प्रशिक्षक या पदांसाठीही अर्ज मागवले आहेत. शिवाय द्रविड मुख्य प्रशिक्षक होणार असल्यानं राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचं ( NCA) अध्यक्षपद रिक्त होणार आहे आणि त्यासाठीही अर्ज मागवण्यात आले आहेत. मुख्य प्रशिक्षकपदासाठी २६ ऑक्टोबर सायंकाळी ५ वाजेपर्यंत इच्छुकांना अर्ज पाठवायचे आहे, तर अन्य पदांसाठी ३ नोव्हेंबरची अंतिम तारीख ठेवण्यात आली आहे.
राहुल द्रविडला पूर्ण कराव्या लागतील पाच अटी- वय ६० वर्षांपेक्षा कमी असायला हवं. दोन वर्षांचा कार्यकाळ असेल आणि मुख्य प्रशिक्षकासह १४-१६ सपोर्ट स्टाफ सदस्य असतील.
- किमान ३० कसोटी किंवा ५० वन डे सामन्यांचा अनुभव गाठीशी असायला हवा
- आंतरराष्ट्रीय कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून किमान दोन वर्षांचा अनुभव
- अन्यथा, संलग्न सदस्य/आयपीएल संघ/कोणत्याही परदेशी लीग किंवा प्रथम श्रेणी क्रिकेट संघाचा तीन वर्षांचा प्रशिक्षकाचा अनुभव
- बीसीसीआयचे प्रशिक्षकासाठीचे लेव्हल ३ सर्टिफिकेट
![]()
२०१२मध्ये राहुल द्रविडनं क्रिकेटपटू म्हणून निवृत्ती घेतली. २०१६मध्ये त्याच्या खांद्यावर १९ वर्षांखालील व भारत अ संघाच्या प्रशिक्षकाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्याच वर्षी भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप संघाचे उपविजेतेपदापर्यंत मजल मारली, परंतु २०१८मध्ये जेतेपद पटकावले. २०१९साली तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा ( NCA) प्रमुख बनला.