Preity Zinta on Virat Kohli Test Retirement : भारतीय संघातील स्टार क्रिकेटर विराट कोहली याने १२ मे रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा मोठा निर्णय घेतलाय. त्याने अचानक घेतलेल्या निर्णयामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय. काहींच्या मनात तर आता कसोटी क्रिकेट पाहायची कुणासाठी? असा प्रश्न पडलाय. त्यातील सर्वात आघाडीचे नाव म्हणजे आयपीएलमधील पंजाब किंग्ज संघाची सह मालकीण आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा. तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून विराट कोहलीच्या कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीसंदर्भातील मनातील भावना व्यक्त केली आहे. तिची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मी फक्त विराटसाठी कसोटी पाहायचे
१३ मे रोजी प्रीती झिंटा हिने एक्स अकाउंटवरील खास चॅट सेशनच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी तिला विराट कोहलीच्या निवृत्तीची बातमी कळल्यावर पहिली प्रतिक्रिया काय होती? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर अभिनेत्रीने मी फक्त विराटसाठीच कसोटी पाहायचे, असे उत्तर दिले. एवढेच नाही तर आता कसोटीत पहिल्यासाठी मजा उरणार नाही, असेही तिने बोलून दाखवले आहे.
प्रीतीची व्हायरल पोस्ट
"मी खासकरून विराटसाठीच कसोटी पाहायचे. त्याने क्रिकेटच्या या प्रकारात एक वेगळा रंग भरला. मला वाटते की, आता कसोटी क्रिकेट कधीही पहिल्यासारखे मजा नसेल. त्याच्या भविष्याच्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देते. विराट, रोहित आणि अश्विन तिघांच्या कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीमुळे भारतीय कसोटी संघातील खेळाडूंसमोर एक मोठे आव्हान असेल." अशा शब्दांत तिने आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.
कसोटीतील 'टेस्ट'च फिकी झाली
विराट कोहलीनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यामुळे प्रीतीच नाही तर अनेक क्रिकेट चाहत्यांच्या मनातील भावना ही कसोटीतील 'टेस्ट' फिकी झालीये, अशीच आहे. कोहलीनं कसोटीतील १४ वर्षांच्या प्रवासात १२३ सामन्यांत ३० शतके आणि ३१ अर्धशतकासह ९२३० धावा केल्या. महान क्रिकेटरपैकी एक असलेल्या विराट कोहलीचं नाव कसोटीत १० हजार धावा करणाऱ्या क्लबमध्ये नसल्याची खंतही सातत्याने सतावत राहिल.