Babar Azam Century in PSL 2024 ( Marathi News ) : पाकिस्तान सुपर लीगमध्ये बाबर आजमने पेशावर जाल्मी संघासाठी झंझावाती शतक झळकावले. पेशावरकडून सलामीला आलेल्या बाबरने १४ चौकार आणि २ षटकारांसह १७६.१९च्या स्ट्राइकरेटने ६३ चेंडूत १११ धावांची नाबाद खेळी केली. बाबरने पीएसएल कारकिर्दीतील तिसरे आणि ट्वेंटी-२० कारकिर्दीतील आतापर्यंतचे ११वे शतक झळकावले. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक २२ शतकं करणाऱ्या ख्रिस गेलनंतर आता बाबरचाच नंबर येतो.
पेशावर जाल्मी आणि इस्लामाबाद युनायटेड यांच्यात लाहोरच्या मैदानावर हा सामना झाला. यामध्ये पेशावरसाठी सलामीला आलेल्या कर्णधार बाबरने सुरुवातीपासूनच आकर्षक फटकेबाजी केली. त्याने पहिल्या ४२ चेंडूंत ५२ धावा केल्या होत्या, परंतु पुढील २१ चेंडूंत त्याने ५९ धावा चोपून शतक पूर्ण केले. पेशावरसाठी अयुबने २१ चेंडूंत ३ चौकार आणि २ षटकारांसह ३८ धावा केल्या आणि संघाने ५ बाद २०१ धावा उभ्या केल्या. या शतकी खेळीवर आनंदी होत पेशावर जाल्मी संघाच्या मालकांनी बाबरला MG गाडी गिफ्ट देण्याची घोषणा केली.
![]()
२९ वर्षीय बाबरच्या ट्वंटी-२० कारकिर्दीतील हे त्याचे ११वे शतक ठरले. ट्वेंटी-२०क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणारा तो जगातील दुसरा फलंदाज ठरला आहे.
ख्रिस गेलच्या नावावर ४६३ सामन्यांमध्ये सर्वाधिक २२ शतकं आहेत, त्यानंतर
बाबर आजम ( २८४ सामने) याचा क्रमांक येतो. या यादीत २८३ सामन्यांमध्ये आठ शतकांसह मायकल क्लिंगरचे नाव आहे आणि चौथ्या स्थानावर विराट कोहली आहे. ज्याने ३७६ ट्वेंटी-२० सामन्यांमध्ये ( ३५९डाव) ८ शतके झळकावली आहेत, तर डेव्हिड वॉर्नर ३६९ डावांमध्ये ८ शतकांसह पाचव्या स्थानावर आहे.