Preity Zinta Glenn Maxwell Punjab Kings IPL 2025: भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर सध्या IPLची 'रन'भूमी शांत आहे. युद्धसदृश परिस्थितीमुळे बीसीसीआयने IPL स्थगित केले होते. पण आता १७ मे पासून पुन्हा IPL चा धामधूम सुरु होणार आहे. ३ जूनला या स्पर्धेतील अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. पंजाब किंग्ज संघाची यंदाच्या हंगामातील कामगिरी दमदार आहे. त्यांचे आता साखळी फेरीतील तीन सामने शिल्लक आहेत. त्याआधी पंजाब संघाची मालकीण प्रिती झिंटा आणि संघाचा फलंदाज ग्लेन मॅक्सवेल यांच्याबद्दल एक गोष्ट घडली आहे. एका चाहत्याने प्रिती झिंटाला थेट ग्लेन मॅक्सवेलशीलग्नाबद्दल प्रश्न विचारला. त्यावर संतापलेल्या प्रिती झिंटाने त्या चाहत्याला खरमरीत उत्तर दिले.
प्रिती झिंटाने आज संध्याकाळी ट्विटर सेशनवरून चाहत्यांशी प्रश्नोत्तरांचा संवाद साधला. त्यावेळी notorious (@AakashA79771091) या ट्विटर युजरने प्रिती झिंटाला प्रश्न विचारला, "मॅडम, मॅक्सवेलचे तुमच्याशी लग्न झाले नाही, म्हणून तो तुमच्या संघाकडून चांगला खेळ खेळत नव्हता का?"
चाहत्याच्या या प्रश्नावर प्रिती झिंटा खूपच चिडली. "तुम्ही हा प्रश्न सर्व संघांच्या पुरुष संघ मालकांना विचाराल का, की हा भेदभाव फक्त महिलांशीच आहे? मी क्रिकेटमध्ये येईपर्यंत मला कधीच माहित नव्हते की महिलांसाठी कॉर्पोरेट सेटअपमध्ये टिकून राहणे किती कठीण आहे. मला खात्री आहे की तुम्ही हा प्रश्न मस्करीत विचारला असेल, परंतु मला आशा आहे की तुम्ही तुमच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहाल आणि तुम्ही काय म्हणण्याचा प्रयत्न करत आहात ते समजून घ्याल. कारण जर तुम्हाला खरोखरच समजले असेल की तुम्ही काय म्हणण्याचा प्रयत्न करत आहात, तर हा प्रश्न चांगला नाहीये! मला वाटते की मी गेल्या १८ वर्षांपासून खूप मेहनत करून माझे पद मिळवले आहे, म्हणून कृपया मला योग्य तो आदर द्या आणि स्त्री-पुरूष असा भेद करणे थांबवा. धन्यवाद," असे प्रिती झिंटाने खडसावून सांगितले.
दरम्यान, पंजाब किंग्ज संघातून हंगामाच्या मध्यातच ग्लेन मॅक्सवेलने माघार घेतली. बोटाच्या दुखापतीमुळे ग्लेन मॅक्सवेल स्पर्धेतून बाहेर पडला. त्यावेळी तो खराब फॉर्मशी झुंजत होता. त्याच्या जागी पंजाब किंग्जने मिचेल ओवेनचा संघात समावेश केला आहे. ओवेनला टी२० लीगमध्ये खेळण्याचा अनुभव असून आयपीएलमध्ये पंजाबकडून खेळताना तो चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षा आहे.