भारत, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या त्रिकोणीय मालिकेत भारतीय महिला क्रिकेट संघातील फलंदाज प्रतिका रावलने इतिहास रचला. दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या सामन्यात प्रतिकाने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद ५०० धावांचा टप्पा गाठला. अशी कामगिरी करणारी ती पहिलीच महिला क्रिकेटपटू ठरली आहे. याशिवाय, प्रतिकाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलग पाचव्यांदा ५० किंवा त्यापेक्षा धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलग पाच वेळा अर्धशतक झळकावणारी ती दुसरी भारतीय फलंदाज ठरली आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रतिका रावलने भारताची सलामीवीर स्मृती मानधना हिच्यासोबत पहिल्या विकेटसाठी ८३ धावांची भागिदारी रचली. मानधनाने ५४ चेंडूत ३६ धावा केल्या. एनेरी डर्कसेनने तिला बाद केले. तर, प्रतिका रावलने ९१ चेंडूत ७८ धावा केल्या. या डावात तिने एक षटकार आणि सात चौकार मारले. तिने हरलीन देओलसोबतही दुसऱ्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी केली.
ऐतिहासिक कामगिरीया सामन्यात प्रतीका रावलने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५०० धावाही पूर्ण केल्या. ती सर्वात जलद ५०० एकदिवसीय धावा करणारी महिला क्रिकेटपटू बनली आहे. या त्रिकोणी मालिकेतील पहिल्या सामन्यातही प्रतीकाने ६२ चेंडूत ५० धावांची शानदार खेळी केली होती, ज्यासाठी तिला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. भारताने हा तो सामना ९ विकेट्सने जिंकला. प्रतीकाने अवघ्या आठ डावांमध्ये ५०० एकदिवसीय धावा पूर्ण केल्या.
आयर्लंडविरुद्ध १५४ धावांची खेळीया त्रिकोणी मालिकेआधी प्रतिकाने राजकोटच्या मैदानावर आयर्लंडविरुद्ध तीन अर्धशतके झळकावली. प्रतिका रावलने १५ जानेवारी २०२५ रोजी आयर्लंड महिला संघाविरुद्ध १५४ धावांची विक्रमी खेळी खेळली. त्याआधी तिने दोन सामन्यांमध्ये अनुक्रमे ८९ आणि ६७ धावा केल्या होत्या.