दुबई : ऑस्ट्रेलियात भारताच्या ऐतिहासिक मालिका विजयाचा प्रमुख आधारस्तंभ ठरलेला यष्टिरक्षक - फलंदाज ऋषभ पंत याला मंगळवारी इंग्लंडचा कर्णधार ज्यो रूट तसेच आयर्लंडचा पॉल स्टर्लिंग याच्यासोबत आयसीसीच्या या महिन्याच्या सर्वोत्कृष्ट पुरुष क्रिकेटपटू म्हणून नामांकन मिळाले आहे. आयसीसीने प्रथमच महिन्याच्या सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी नामांकन जाहीर केले. या पुरस्कारांवरून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्व प्रकारात दमदार कामगिरी करणारे पुरुष आणि महिला खेळाडू निवडले जातील. २३ वर्षांच्या पंतने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी कसोटीत ९७ धावा केल्याने सामना बरोबरीत सुटण्यास मदत झाली होती. ब्रिस्बेन कसोटीत चौथ्या डावात त्याने नाबाद ८९ धावांची खेळी करीत भारताला विजय मिळवून दिला, शिवाय मालिका जिंकून दिली होती.
रूटने जानेवारीत श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटीत २२८ आणि १८६ धावा ठोकून संघाला २-० ने मालिका जिंकून दिली. स्टर्लिंगने युएईविरूद्ध दोन आणि अफगाणिस्तानविरूद्ध तीन वन डे खेळून तीन शतके ठोकली.
महिला खेळाडूंमध्ये पाकिस्तानची डायना बेग आणि द. आफ्रिकेची शबनिम इस्माईल तसेच मारिजेन केप यानना मासिक पुरस्कारासाठी नामांकन लाभले आहे. बेग ही द. आफ्रकेविरुद्ध मालिकेत सर्वांत यशस्वी गोलंदाज होती. इस्माईलने पाकविरुद्ध वन डे तसेच टी-२० मालिकेत एकूण १२ गडी बाद केले. मारिजेनने पाकविरुद्ध अष्टपैलू कामगिरी केली. पुरस्कार विजेत्यांचा निर्णय प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी आयसीसीच्या डिजिटल चॅनल्सवर होतो.