आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची मंगळवारी दुबई बैठक झाली. बैठकीत आशिया कप वाद उपस्थित करण्यात आला. त्यानंतर आयसीसीनेपाकिस्तानी खेळाडू हरिस रौफला दोन सामन्यांसाठी निलंबित केले, तर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवला त्याच्या सामन्याच्या मानधनाच्या ३० टक्के दंड ठोठावण्यात आला. २०२५ च्या आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम सामन्यासह तीन सामने खेळले. या सामन्यांदरम्यान खेळाडूंमध्ये तणाव निर्माण झाला होता, याला आयसीसीने नियमांचे उल्लंघन मानले.
दुबईतील या बैठकीत, आयसीसीने भारत-पाकिस्तान सामन्यांदरम्यान खेळाडूंनी केलेल्या नियमांच्या उल्लंघनाच्या प्रकरणांवर आपला निर्णय जाहीर केला. सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, हरिस रौफ आणि साहिबजादा फरहान यांच्यासह वेगवेगळ्या सामन्यांमध्ये पाच खेळाडूंवर कारवाई करण्यात आली असल्याचे आयसीसीने आपल्या निर्णयात म्हटले आहे.
हे सर्व खटले सप्टेंबर २०२५ मध्ये खेळल्या गेलेल्या आशिया कपमधील तीन सामन्यांशी संबंधित आहेत. या खटल्यांची सुनावणी एमिरेट्स आयसीसी एलिट पॅनेल ऑफ मॅच रेफ्रीजच्या सदस्यांनी केली. 14, 21 आणि 28 सप्टेंबर रोजी पारंपरिक प्रतिस्पर्धी संघांमधील सामन्यांदरम्यान या घटना घडल्या होत्या.