T20 World Cup 2026 Pakistani Former Cricketer Danish Kaneria Slams PCB For Boycott Match Against India : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होण्याआधी पाकिस्तानच्या एका निर्णयामुळे वातावरण तापले आहे. बांगलादेशला बाहेर काढल्याच्या मुद्यावरून पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं टीम इंडियाविरुद्धच्या हायहोल्टेज सान्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. बांगलादेशचे सामने श्रीलंकेत स्थलांतरित करा, अन्यथा आम्हीही त्यांच्यासोबत स्पर्धेतून माघार घेऊ, अशी धमकी याआधी पाकिस्तानने दिली होती. पण एका बाजूला बांगलादेश हट्टीपणामुळे स्पर्धेबाहेर गेला. दुसरीकडे पाकिस्तानच्या संघाने टी-२० वर्ल्ड कपसाठी आपला संघ जाहीर केला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सरकारच्या साथीनं PCB ची नवी नौटंकी?
संघ जाहीर केला असला तरी या स्पर्धेत खेळण्यासंदर्भातील अंतिम निर्णय सरकार घेईल, अशी भूमिका त्यांनी मांडली. स्पर्धेत सहभागी होण्याचा संभ्रम दूर करताना पाकिस्तानने नवा डाव खेळला. पाकिस्तान सरकारने आपल्या क्रिकेट संघाने स्पर्धेत सहभागी व्हावे, पण १५ फेब्रुवारीला भारताविरुद्ध खेळू नये, असा फतवा काढला. खरं तर ही चाल PCB आणि पाकिस्तान सरकार यांनी मिळून सुरु केलेली एक नौटंकीच आहे. ICC नं यावर पाकिस्तानला गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी ताकीदही दिली आहे. पण ICC नं याप्रकरणात अद्याप ठाम भूमिका घेतलेली नाही. यामागचं कारण पाकिस्तान सरकारने मोठा गाजावाजा करत भारताविरुद्धच्या सामन्यात बहिष्कार टाकण्याची घोषणा केली असली तरी यासंदर्भात PCB नं अधिकृतरित्या ICC ला तसे कळवलेले नाही.
IND vs PAK : ‘वेट अँड वॉच’… BCCI चा पाकिस्तानला इशारा; ICC च्या निवेदनावर मत मांडले, पण…
पाकिस्तानला भारताची धास्ती?
खरंच पाकिस्तान क्रिकेट बोर्ड सरकारच्या निर्णयावर ठाम राहणार, की आयत्यावेळी यू टर्न घेणार? या परिस्थितीत ICC कडून पाक संघावर काय कारवाई होणार? अशा अनेक गोष्टी चर्चेचा विषय ठरत आहे. या सर्व घडामोंडीवर पाकिस्तानचा माजी फिरकीपटूनं PCB ला घरचा आहेर दिला आहे. पाकिस्तानचा संघ टीम इंडियाविरुद्ध खेळायला घाबरत आहे. त्यामुळेच हा निर्णय घेतला असावा, असा आरोप पाकच्या दिग्गजाने केला आहे. कोण आहे तो क्रिकेटर आणि त्याने नेमकं काय म्हटलं आहे? जाणून घेऊयात सविस्तर
वृत्तसंस्था IANS शी बोलताना दानिश कनेरिया म्हणाला आहे की, "भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्यासाठी पाकिस्तानकडे कोणताही ठोस आधार नाही. जो बांगलादेश आधीच स्पर्धेतून बाहेर आहे, त्याच्या समर्थनासाठी पाकिस्तानने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जगाला असा संदेश जाईल की, पाकिस्तानची टीम भारताचा सामना करण्यास घाबरते आणि म्हणूनच त्यांनी खेळण्यास नकार दिला."
सेमीफायनलचा मार्ग खडतर
कनेरिया पुढे म्हणाला की, "या निर्णयामुळे पाकिस्तानसाठी सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचा मार्ग अधिक कठीण होईल. मला वाटतं पाकिस्तानचा हा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे. पाकिस्तानला वाटत असेल की, भारत-पाकिस्तान सामना हा कमाईचं साधन आहे, तर आता ही प्रतिद्वंद्विता संपुष्टात आली आहे. पाकिस्तान सध्या भारत खेळतो तसा दर्जेदार क्रिकेट खेळत नाही. टी २० वर्ल्ड कप असो किंवा ५० षटकांचा विश्वचषक-भारताने नेहमीच पाकिस्तानवर मात केली आहे." ही गोष्टही त्याने बोलून दाखवली.