Join us

Pakistani Ex Captain Praises Team India: विराटची टीम इंडिया 'स्पेशल' का? पाकिस्तानी माजी कर्णधाराने सांगितलं कारण

भारतीय संघाने आफ्रिकेचा गड मानल्या जाणाऱ्या सेंच्युरियनच्या मैदानावर यजमानांना पराभवाची धूळ चारली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 18:24 IST

Open in App

भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध पहिली कसोटी जिंकली. भारताने यजमानांना ११३ धावांनी पराभूत केले आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. लोकेश राहुलचे धडाकेबाज शतक आणि मोहम्मद शमीचे सामन्यात आठ बळी हे पहिल्या कसोटीचे आकर्षण होते. दक्षिण आफ्रिकेचा गड मानल्या जाणाऱ्या सेंच्युरियनच्या मैदानावर भारताने त्यांना धूळ चारली. सेंच्युरियनवर आफ्रिकेला पराभूत करणारा भारत हा पहिला आशियाई संघ ठरला. भारतीयांनी या गोष्टीचा सोशल मीडियावर अभिमान व्यक्त केला. पाकिस्तानच्या माजी कर्णधारानेदेखील भारतीय संघाचे कौतुक केलं. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ हा स्पेशल असल्याचे त्याने म्हटलं. तसंच हा संघ स्पेशल का आहे, याचंही कारण सांगितलं.

"परदेशी जमिनीवर कसोटी सामना जिंकण्याने आत्मविश्वास वाढतो. जो संघ खेळपट्ट्यांवर किंवा इतर परिस्थितींवर अवलंबून न राहता अप्रतिम खेळ करतो आणि कसोटी सामना जिंकतो, तो संघ नक्कीच विशेष असतो. अशा संघाशी सामना खेळणं अधिक आव्हानात्मक असतं. सध्याच्या घडीला कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघ हा विशेष संघ आहे. ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमिवर पराभूत करून त्यांनी कसोटी क्रिकेटची नवीन उंची दाखवून दिली आहे. भारताचा संघ नक्कीच स्पेशल आहे. त्याचं मूळ कारण म्हणजे कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा संघ केवळ जिंकतंच नाही तर प्रत्येक सामन्यानंतर आपल्या खेळाडूंचं आणि खेळीचं आत्मपरिक्षण करतो. सामन्यात आपलं काय चुकलं, काय बरोबर होतं, याचा अभ्यास भारतीय संघ करत असतो. त्यामुळे प्रत्येकवेळी ते भविष्यातील सामन्यासाठी नव्याने तयार होऊन मैदानात उतरतात", अशा शब्दात पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बट याने विराटच्या टीम इंडियाचं कौतुक केलं.

भारताने पाकिस्तानला केलं 'ओव्हरटेक'

भारतीय संघाने आफ्रिकेला पराभूत करत पहिली कसोटी जिंकली. त्यासोबत भारताने २०२१ या वर्षात आठवा कसोटी विजय संपादन केला. भारताने २०२१ या वर्षाच्या सुरूवातीला ऑस्ट्रेलियाविरूद्ध एक कसोटी सामना जिंकला. त्यानंतर इंग्लंड विरूद्ध तीन कसोटी सामने भारतात आणि इंग्लंड दौऱ्यावर दोन कसोटी जिंकल्या. तसंच न्यूझीलंड विरूद्ध एक कसोटी सामनाही जिंकला. २०२१ या वर्षभरात पाकिस्तानने सर्वाधिक ७ कसोटी विजय मिळवले होते. पाकिस्तानला काल भारताने मागे टाकत यंदाच्या वर्षी बाजी मारली.

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाविराट कोहलीभारत विरुद्ध पाकिस्तानभारतीय क्रिकेट संघ
Open in App