Join us

India vs Pakistan, Asia Cup 2023: "भारतीय संघ आशिया कपसाठी खेळण्यासाठी आमच्या देशात आला नाही तर..."; पाकिस्तानची धमकी

२००८ पासून भारताने पाकिस्तानशी क्रिकेटचे द्विपक्षीय संबंध संपवले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2023 14:06 IST

Open in App

India vs Pakistan, Asia Cup 2023: आशिया खंडातील प्रतिष्ठित स्पर्धा म्हणजे आशिया कप. सप्टेंबरमध्ये यंदाच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पण आता या स्पर्धेचे पाकिस्तानातील आयोजन संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. शनिवारी (४ फेब्रुवारी) बहारीन येथे झालेल्या बैठकीत आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष आणि BCCI चे सचिव जय शाह यांनी पुन्हा एकदा सांगितले की, भारतीय संघ पाकिस्तानात क्रिकेट खेळण्यासाठी येणार नाही. स्पर्धा इतरत्र तटस्थ ठिकाणी आयोजित केली जाईल. नव्या जागेबाबतचा निर्णय पुढील महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. या प्रकारानंतर आता पाकिस्तानने देखील भारताला धमकी दिली असल्याची माहिती देण्यात येत आहे.

२००८ पासून भारताने पाकिस्तानशी क्रिकेटचे द्विपक्षीय संबंध संपवले आहेत. जवळपास १५ वर्षांनंतर भारतीय संघ पाकिस्तानला जाण्याची शक्यता होती, परंतु तसे होणार नाही. BCCI ने शनिवारी आशियाई क्रिकेट कौन्सिलच्या बैठकीत आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर, पाकिस्तानी मीडियामध्ये अशा बातम्या येत आहेत की पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने देखील स्पष्ट केले आहे की पाकिस्तानचा पुरुष क्रिकेट संघ आगामी वन डे  विश्वचषक स्पर्धेत भाग घेण्यासाठी भारतात येणार नाही. या वर्षाच्या अखेरीस आशिया कप स्पर्धा पाकिस्तानमधून बाहेर पडल्यास पाकिस्तान असा निर्णय घेणार असल्याचे सांगितले जात आहे.

पाकिस्तानी पत्रकार फरीद खान आणि इतर विविध पाकिस्तानी चॅनेलच्या मते, ACC बैठकीत PCB प्रमुख नजम सेठी यांनी जय शाह यांची भेट घेतली आणि त्यांना पाकिस्तानच्या निर्णयाची जाणीव करून दिली. गेल्या वर्षी रमीझ राजाची जागा घेणारे अनुभवी प्रशासक सेठी म्हणाले, "जर तुम्ही पाकिस्तानमध्ये खेळायला आला नाही, तर आम्हीही भारतात खेळणार नाही आणि तसं झालं तर २०२३च्या विश्वचषकात पाकिस्तान नसेल."

यापूर्वी, रमीज राजा जेव्हा PCB अध्यक्ष होते, तेव्हा त्यांनीही असेच म्हटले होते की भारताने आशिया चषकासाठी पाकिस्तानला न येण्याचा निर्णय घेतला, तर पाकिस्तान वन डे विश्वचषकावर बहिष्कार टाकेल. दरम्यान, भारतातील विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार, आशिया चषक २०२३चे आयोजन संयुक्त अरब अमिरातीमध्ये म्हणजे युएईमध्ये केले जाऊ शकते आणि त्याचे यजमानपद पाकिस्तानला दिले जाऊ शकते.

टॅग्स :एशिया कप 2022भारतपाकिस्तान
Open in App