Mohsin Naqvi Asia Cup 2025 Trophy Controversy Update, India vs Pakistan : आशिया चषक स्पर्धा २०२५च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानवर पाच गडी राखून विजय मिळवला. पण पाकिस्तानचे मंत्री असलेले आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी घेण्यास टीम इंडियाने नकार दिला. त्यामुळे कर्णधार सूर्यकुमार यादवला ट्रॉफी न देता, नक्वी ती ट्रॉफी आणि मेडल्स स्वत:कडे घेऊन गेले. या वादामुळे भारतीय संघाला अद्याप विजेतेपदाची ट्रॉफी मिळालेली नाही. यावरून ACC च्या बैठकीत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि नक्वी यांच्यात तुफान राडा झाल्याचे सांगितले गेले. तसेच, आता नक्वी ट्रॉफी परत देण्यासही तयार असल्याचे सांगितले जात आहे. पण त्याचदरम्यान पाकिस्तानातून एक बातमी आली आहे.
मोहसीन नक्वी यांना मेडल कशाबद्दल?
आशिया कपमध्ये भारत चॅम्पियन बनूनही टीम इंडियाची हक्काची ट्रॉफी त्यांना न देणारे आणि ट्रॉफीसह विजेत्यांची मेडल्सही आपल्या हॉटेल रूममध्ये पळवून घेऊन जाणारे मोहसीन नक्वी यांना आता या कृत्यासाठी पाकिस्तानमध्ये सन्मानित केले जाणार आहे. पाकिस्तानी न्यूज पोर्टल द नेशनच्या वृत्तानुसार, २०२५ च्या आशिया कप दरम्यान मोहसीन नक्वी यांना त्यांच्या कथित 'कठोर शिस्तप्रिय भूमिके'साठी पदक देण्यात येणार आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, सिंध आणि कराची बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष अँडव्होकेट गुलाम अब्बास जमाल यांनी घोषणा केली की, पीसीबी आणि आशियाई क्रिकेट कौन्सिल (एसीसी) चे अध्यक्ष नक्वी यांना 'शहीद झुल्फिकार अली भुट्टो एक्सलन्स गोल्ड मेडल' प्रदान करण्यात येईल. नक्वी यांना आशिया कप दरम्यान त्यांच्या 'निर्भय आणि तत्वनिष्ठ' भूमिकेसाठी हे पदक देण्यात येईल.
नक्वींवर पोलिस कारवाईची शक्यता?
एकीकडे सन्मानाचे मेडल मिळण्याची चर्चा असतानाच, दुसरीकडे नक्वी यांच्यावर पोलिस कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे. आशिया चषकातील अंतिम सामन्याला बराच काळ उलटूनही मोहसीन नक्वींनी विजेतेपदाची ट्रॉफी ना भारताला दिली, ना ACC च्या कार्यालयात सुपूर्द केली. उलट ती त्यांच्या हॉटेलच्या खोलीतच ठेवली असल्याचा आरोप आहे. हा मुद्दा ACC बैठकीतही उपस्थित झाला होता. अनेक देशांच्या प्रतिनिधींनी नक्वींच्या कृतीचा विरोध व निषेध केला. पण नक्वी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे बीसीसीआय नक्वींविरोधात दुबई पोलिसात तक्रार करण्याच्या तयारीत आहे, असे सांगितले जात आहे.