Pakistan Mohammad Nawaz hat-trick: संयुक्त अरब अमिराती (UAE) येथे आशिया कपच्या तयारीचा भाग म्हणून यजमान UAE, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात तिरंगी टी२० मालिका खेळली गेली. रविवारी ७ सप्टेंबरला शारजाह येथे अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात स्पर्धेचा अंतिम सामना खेळला गेला. त्यात पाकिस्तानने विजय मिळवला. पाकिस्तान क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नवाजने त्याच्या फिरकीने सामना फिरवला. अफगाणिस्तानविरुद्धच्या टी२० तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात डावखुरा फिरकी गोलंदाज नवाजने हॅटट्रिक घेऊन खळबळ उडवून दिली. या सामन्यात नवाजने पहिल्याच षटकात हॅटट्रिक घेतली आणि अफगाणिस्तानच्या फलंदाजीला नमवले. यासह, तो टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात हॅटट्रिक घेणारा तिसरा पाकिस्तानी गोलंदाज ठरला. नवाजच्या गोलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानने हा सामना ७५ धावांनी जिंकला आणि ट्रॉफीवर कब्जा केला.
नवाज पाकिस्तानचा तिसरा 'टी२० हॅटट्रिकवीर'
स्पर्धेत चांगली गोलंदाजी करणाऱ्या नवाजने अंतिम सामन्यातही हाच ट्रेंड कायम ठेवला. डावाच्या सहाव्या आणि आपल्या पहिल्या षटकात गोलंदाजी करताना नवाजने पहिल्या चार चेंडूत फक्त १ धाव दिली. नंतर शेवटच्या २ चेंडूत सलग २ बळी घेतले. त्याने षटकाच्या पाचव्या चेंडूवर दरविश रसूलीला बाद केले आणि त्यानंतर पुढच्या चेंडूवर अझमतुल्लाह उमरझईला माघारी पाठवले. त्यानंतर पुढच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर त्याने इब्राहिम झादरानला यष्टिचित करत हॅटट्रिक पूर्ण केली.
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेणारा नवाज तिसरा पाकिस्तानी गोलंदाज ठरला. यापूर्वी पाकिस्तानकडून फहीम अश्रफ (२०१७) आणि मोहम्मद हसनैन (२०१९) यांनी हॅटट्रिक घेतली होती. दोघांनीही श्रीलंकेविरुद्ध ही कामगिरी केली होती. यावेळी मात्र नवाजने अफगाणिस्तानविरूद्ध ही कामगिरी केली.