Shahid Afridi, Bangladesh Issue in T20 World Cup 2026: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बांगलादेशला २०२६ च्या T20 विश्वचषकातून वगळले. सुरक्षेच्या कारणास्तव बांगलादेश संघाने भारतात जाण्यास नकार दिल्यानंतर ICC ने हा कठोर निर्णय घेतला. आता ICC ने बांगलादेशऐवजी स्कॉटलंडला स्पर्धेत समाविष्ट केले आहे. २३ जानेवारीला ICC ने बांगलादेश क्रिकेट बोर्डाला (BCB) संघ भारतात जाणार की नाही हे स्पष्ट करण्यासाठी २४ तासांचा वेळ दिला. पण निर्धारित वेळेत कोणताही स्पष्ट प्रतिसाद न मिळाल्याने, ICC ने कठोर निर्णय घेतला आणि स्कॉटलंडला बदली संघ म्हणून घोषित केले. या निर्णयामुळे क्रिकेट जगतात वाद सुरू झाला आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने ICC वर टीका केली आहे.
"मी एक माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे. मी बांगलादेशातही खेळलोय आणि ICCच्या स्पर्धांमध्येही खेळलोय. ICCने बांगलादेशला टी२० विश्वचषकातून वगळण्याचा घेतलेला निर्णय दुटप्पी आहे. जेव्हा भारतीय संघ २०२५च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानचा दौरा करणार नाही म्हणाला तेव्हा, त्यांची विनंती ICCकडून स्वीकारण्यात आली, पण त्याच मुद्द्यावर बांगलादेशची विनंती फेटाळण्यात आली. निर्णयक्षमतेतील सातत्य आणि निष्पक्षता हा जागतिक क्रिकेट प्रशासनाचा पाया आहे. बांगलादेशचे खेळाडू आणि त्यांचे लाखो क्रिकेट चाहते या दुटप्पी धोरणास नव्हे तर आदर मिळण्यास पात्र आहेत. अशा वेळी ICC ने दोन देशांमध्ये भिंती नव्हे, तर सामंजस्याचे पूल बांधले पाहिजेत," अशा शब्दांत शाहिद आफ्रिदीने टीका केली.
![]()
दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज जेसन गिलेस्पी यांनेही आयसीसीच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भारताला टी२० विश्वचषक आयोजित करण्याची परवानगी असताना बांगलादेशला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये तटस्थ ठिकाणाचा पर्याय का नाकारण्यात आला, असा प्रश्न त्याने विचारला. आयसीसीने या निर्णयाचे स्पष्टीकरण द्यावे असेही तो म्हणाला. दरम्यान, नंतर गिलेस्पीने ती पोस्ट डिलीट केली.
आयसीसीकडून स्पष्टीकरण...
आयसीसीने बांगलादेशची विनंती गांभीर्याने घेतली. आयसीसीने अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा तज्ञांकडून अहवाल मागितले. या अहवालांचा आढावा घेतल्यानंतर, आयसीसीने असा निष्कर्ष काढला की बांगलादेश संघ, अधिकारी किंवा चाहत्यांना कोणताही सुरक्षा धोका नाही. याच आधारावर पुढील घडामोडी घडल्याचे ICCने स्पष्ट केले.
दरम्यान, क्रिकेट स्कॉटलंडने बांगलादेशच्या बाहेर पडल्यानंतर लगेचच आयसीसीचे आमंत्रण स्वीकारले. स्कॉटलंडने एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की ते संधीसाठी आयसीसीचे आभारी आहेत आणि त्वरित भारतात प्रवास करण्याची तयारी करत आहेत. स्कॉटलंडचे खेळाडू स्पर्धेपूर्वी स्थानिक परिस्थितीशी जुळवून घेऊ इच्छितात. त्यामुळे ते लवकरत भारतात येतील. २०२६चा टी२० विश्वचषक ७ फेब्रुवारीला रोजी सुरू होणार आहे, तर अंतिम सामना ८ मार्च रोजी होणार आहे.