नवी दिल्ली - पाकिस्तानचा क्रिकेट संघ अडचणीत सापडला आहे. झिम्बाब्वेमध्ये टी-20 तिरंगी मालिका जिंकल्यापासून पाकिस्तानचा संघ येथे अडकला आहे. यामागे झिम्बाब्वे क्रिकेट असोसिएशनची आर्थिक तंगी हे कारण आहे. टी-20 मालिकेनंतर पाकिस्तानचा संघ वन डे मालिकेसाठी बुलवायो येथे जाणे अपेक्षित होते, परंतु खेळाडूंसाठी हॉटेलचे बुकिंग करण्यासाठी झिम्बाब्वे क्रिकेट मंडळ पैशांची जुळवाजुळव करण्यात अपयशी ठरले.
रविवारी पाकिस्तानने टी-20 मालिकेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला 6 विकेट्स राखून पराभूत केले आणि जेतेपदाचा चषक उंचावला. त्यानंतर सोमवारी पाकिस्तानचा संघ बुलवायोसाठी रवाना होणार होता. मात्र, तेथे त्यांच्या राहण्याची सोय करण्यात आली नव्हती. बुलवायो येथील हॉटेलमध्ये त्यांच्याकडून बुकिंग करण्यासाठी पैसे मागितले, परंतु झिम्बाब्वे असोसिएशनकडे पैसे नसल्याने त्यांची बुकिंग रद्द करण्यात आली.