Join us
Daily Top 2Weekly Top 5

तालिबानच्या हल्ल्यांनी पाकिस्तानची तंतरली; सुरक्षा कारणास्तव PSL बाबत घेतला मोठा निर्णय

Pakistan-Afghanistan: मागील काही दिवसांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील संघर्ष वाढला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 18:57 IST

Open in App

Pakistan-Afghanistan: पाकिस्तानमधील बिघडलेल्या सुरक्षा परिस्थितीमुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) पाकिस्तान सुपर लीग (PSL) २०२६ संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. यावर्षीची पाकिस्तान सुपर लीग प्रेक्षकांशिवाय खेळवली जाणार आहे. मध्य पूर्वेतील तणाव आणि अफगाणिस्तानकडून होत असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर पाक क्रिकेट बोर्डाने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. 

प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश नाही

पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नकवीने पत्रकार परिषदेत सांगितले की, देशातील परिस्थिती सामान्य होईपर्यंत स्टेडियममध्ये प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार नाही. तसेच PSL २०२६ चे उद्घाटन समारंभही आयोजित केला जाणार नाही. PSL हा पाकिस्तानचा आंतरराष्ट्रीय ब्रँड असल्यामुळे स्पर्धा रद्द करणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र सध्याच्या परिस्थितीत हजारो प्रेक्षकांना स्टेडियममध्ये आणणे सुरक्षित नसल्याचे सांगितले.

फक्त दोन शहरांमध्ये सामने

PSL २०२६ स्पर्धा २६ मार्च ते ३ मे दरम्यान खेळवली जाणार आहे. यावर्षी स्पर्धा फक्त कराची आणि लाहोर या दोन शहरांमध्येच खेळवली जाणार आहे. यापूर्वी स्पर्धा सहा शहरांमध्ये आयोजित करण्याची योजना होती.

तिकिटांचे पैसे परत मिळणार

पीसीबीने जाहीर केले आहे की, सर्व फ्रँचायझींना गेट मनीचा मोबदला दिला जाईल. ज्यांनी तिकीट खरेदी केली आहेत, त्यांनाही ७२ तासांच्या आत रिफंड दिला जाईल. दरम्यान, यंदा PSL मध्ये एकूण ४४ सामने खेळवले जाणार असून यावर्षी प्रथमच ८ संघ सहभागी होणार आहेत. 

स्पर्धेतील संघ:

१. हैदराबाद किंग्समेन२. इस्लामाबाद युनायटेड३. कराची किंग्स४. लाहोर कलंदर्स५. मुलतान सुल्तान्स६. पेशावर झल्मी७. क्वेटा ग्लॅडिएटर्स८. रावलपिंडी पिंडिज

प्रत्येक संघ १० सामने खेळणार असून, गुणतालिकेतील अव्वल ४ संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करतील. प्लेऑफमध्ये क्वालिफायर १, एलिमिनेटर, क्वालिफायर २ आणि अंतिम सामना खेळवला जाईल. अंतिम सामना ३ मे रोजी लाहोर येथील गद्दाफी स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. पावसामुळे सामना रद्द झाल्यास राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pakistan's PSL 2026 to be held without spectators due to security.

Web Summary : Due to security concerns and attacks, PSL 2026 will be played without spectators in Karachi and Lahore. The opening ceremony is also cancelled. Ticket refunds will be issued. Eight teams will participate, with the final match in Lahore.
टॅग्स :पाकिस्तानअफगाणिस्तानयुद्ध