Join us

न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली

पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका पार पडली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2024 18:01 IST

Open in App

Pakistan vs New Zealand: पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका पार पडली. पावसामुळे एक सामना रद्द झाला मग पुढील एक सामना यजमान पाकिस्तान आणि दोन सामने न्यूझीलंडने जिंकले. पाहुण्या किवी संघाने नवख्या खेळाडूंच्या अप्रतिम खेळीच्या जोरावर २-१ अशी आघाडी घेतली होती. शनिवारी या मालिकेतील अखेरचा आणि  निर्णायक सामना खेळवला गेला. हा सामना जिंकून पाकिस्तानने मालिकेत कशीबशी बरोबरी साधण्यात यश मिळवले. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने सर्वाधिक चार बळी घेत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. 

न्यूझीलंडच्या संघाचे वरिष्ठ खेळाडू आयपीएलमध्ये व्यग्र आहेत. त्यामुळे किवी संघ मायकेल ब्रेसव्हेलच्या नेतृत्वात पाकिस्तान दौऱ्यावर गेला. पाच सामन्यांची मालिका अखेरीस २-२ अशा बरोबरीत संपल्याने यजमानांनी सुटकेचा निश्वास सोडला. किवी संघात अनेक नव्या चेहऱ्यांची फौज होती. तर पाकिस्तानचा संघ विश्वचषकाच्या संघासह मैदानात उतरला होता. असे असूनही किवी संघाने पाकिस्तानच्या तगड्या संघाला घाम फोडला.

मोहम्मद आमिर आणि इमाद वसीम हे निवृत्त झालेले खेळाडू पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आले असून सक्रिय झाले आहेत. आगामी ट्वेंटी-२० विश्वचषकात देखील ते पाकिस्तानच्या संघाचा भाग असणार आहेत. बाबर आझमला पुन्हा एकदा पाकिस्तानी संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. 

शनिवारी झालेल्या पाचव्या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ५ बाद १७८ धावा केल्या होत्या. १७९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडने १९.२ षटकांत सर्वबाद केवळ १६९ धावा केल्या आणि सामना ९ धावांनी गमावला. यजमान संघाकडून शाहीन आफ्रिदीने (४), उसामा मीर (२), आणि शादाब खान आणि इमाद वसीम यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला. 

टॅग्स :पाकिस्तानन्यूझीलंडटी-20 क्रिकेटबाबर आजम