Bangladesh have replaced Pakistan ICC ODI Ranking - पाकिस्तान संघाला मंगळवारी वन डे मालिकेतील पहिल्या लढतीत ऑस्ट्रेलियाकडून दारूण पराभव पत्करावा लागला. ट्रॅव्हिस हेडच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ही वन डे लढत 88 धावांनी जिंकली आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तानातील पाकिस्तानविरुद्धचा हा सर्वात मोठा विजय ठरला. सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या ताफ्यात कोरोनाने शिरकाव केला आणि 12 खेळाडूंमधून अंतिम संघ निवडून हा विजय मिळवला. आयसीसी 2021च्या पुरस्कारांमध्ये सर्वोत्तम खेळाडूंचा पुरस्कार पटकावणारे पाकिस्तानचे खेळाडू ऑसींच्या दुसऱ्या फळीतील खेळाडूंसमोर अपयशी ठरले. हा धक्का कमी होता की काय ICC ODI Ranking मध्ये बांगलादेशनेही पाकिस्तानला धक्का दिला.
ऑस्ट्रेलियाने समोर ठेवलेल्या ३१४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संपूर्ण संघ ४५.२ षटकांत २२५ धावांवर माघारी परतला आणि ऑस्ट्रेलियाने ८८ धावांनी हा सामना जिंकला. ट्रॅव्हिस हेड व कर्णधार आरोन फिंच यांनी पहिल्या विकेटसाठी ११० धावांची भागीदारी केली आणि यात फिंचच्या केवळ २३ धावा होत्या. हेड ७२ चेंडूंत १२ चौकार व ३ षटकारांसह १०१ धावांवर बाद झाला. मॅकडेरमोटने ७० चेंडूंत ४ चौकारांसह ५५ धावा केल्या. कॅमेरून ग्रीनने ३० चेंडूंत नाबाद ४० धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने ७ बाद ३१३ धावा केल्या.
पाकिस्तानने १४ षटकांत १ बाद ६६ धावा केल्या आहेत. प्रत्युत्तरात फाखर जमान ( १८) लगेच माघारी परतल्यानंतर इमान-उल-हक व बाबर आजम यांनी डाव सावरला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ९६ धावांची भागीदारी केली. बाबर ५७ धावांवर स्वीपसनच्या गोलंदाजीवर LBW झाला. इमाम एका बाजूने खिंड लढवताना दिसला आणि त्याने ९६ चेंडूंत १०१ धावांची खेळी केली. अॅडम झम्पाने ३८ धावांत ४ विकेट्स घेतल्या. मिचेल स्वीपसन व ट्रॅव्हिस हेड यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
या पराभवामुळे पाकिस्तानची
आयसीसी वन डे क्रमवारीत 7व्या क्रमांकावर घसरण झाली.
बांगलादेशने नुकत्याच दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर वन डे मालिका जिंकून इतिहास घडवला होता आणि त्यामुळे त्यांनी 6व्या क्रमांकावर झेप घेतली. न्यूझीलंड ( 121), इंग्लंड ( 119), ऑस्ट्रेलिया ( 117), भारत ( 110) व दक्षिण आफ्रिका ( 102) हे टॉप फाईव्ह फलंदाज आहेत. बांगलादेश व पाकिस्तान यांच्या खात्यात प्रत्येकी 93 रेटिंग आहेत.