narendra modi stadium ahmedabad । अहमदाबाद: इंडियन प्रीमिअर लीगच्या (IPL 2023) १६ व्या हंगामाची सुरूवात अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाली. ३१ मार्चला इथे सलामीचा सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (GT vs CSK) यांच्यात खेळवला गेला. आता ९ एप्रिलला गुजरात आणि केकेआरचा सामना याच मैदानावर होणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरातचा संघ विजयाची हॅटट्रिक करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. तर अहमदाबाद पोलीस चोरांना पकडण्यावर लक्ष केंद्रीत करतील. कारण आयपीएलच्या उद्घाटनाच्या सामन्यात नरेंद्र मोदी स्टेडियम येथून तब्बल १५० मोबाईल चोरी झाल्याची माहिती गुजरात पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, १५० जणांनी याबाबतची तक्रार पोलिसांकडे केली आहे. यामधील अनेक तक्रारदारांनी सांगितले की, त्यांनी आयफोन हफ्त्यावर घेतला होता. माहितीनुसार, १५० जणांनी गुजरात पोलिसांकडे तक्रार केली असून पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत. याशिवाय तक्रारदारांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले. आयपीएल २०२३ चा सलामीचा सामना गुजरातच्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला गेला. IPL च्या उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमात अभिनेत्री तमन्ना भाटिया, रश्मिका मंधाना आणि गायक अरिजीत सिंग यांची प्रमुख उपस्थिती होती. लक्षणीय बाब म्हणजे कोविड-19 नंतर प्रथमच आयपीएलच्या उद्घाटन समारंभात स्टार्स परफॉर्म करताना दिसले.
पोलिसांनी दिला इशारा१५० हून अधिक मोबाईल चोरी झाल्यामुळे अहमदाबाद पोलीस सतर्क झाले असून ९ तारखेच्या सामन्यापू्र्वी खबरदारी बाळगली जात आहे. तसेच एवढ्या मोठ्या प्रमाणात मोबाईल चोरी करण्यात एखाद्या टोळीचा हात असू शकतो अशी शंका पोलिसांनी वर्तवली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे शोध घेतला जात आहे. विशेष बाब म्हणजे चोरी करणारी टोळी मोबाईल चोरून डिव्हाइस बदलत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"