Join us  

India vs New Zealand : न्यूझीलंडला धडा शिकविण्याची संधी; ग्रीन पार्कवर पहिली कसोटी आजपासून

भारतीय संघ ऑस्ट्रेलियातील विजयाला प्रेरणा मानून न्यूझीलंडला धडा शिकवू इच्छितो. जूनमध्ये याच न्यूझीलंडने डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात भारताच्या आशेवर पाणी फेरले होते. नवे प्रशिक्षक राहुल द्रविड हे दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी अन्य खेळाडूंना परीक्षा पाहतील.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 8:10 AM

Open in App

कानपूर : नियमित कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मासह काही अव्वल खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारतीय संघ आज गुरुवारपासून येथील ग्रीन पार्कवर सुरू होत असलेल्या पहिल्या कसोटीत दमदार न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर वर्चस्व गाजविण्याच्या निर्धाराने खेळणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून खराब फॉर्ममध्ये असलेला अजिंक्य रहाणे संघाचे नेतृत्व करेल. लोकेश राहुल आणि विश्रांती देण्यात आलेला वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांची सेवादेखील त्याला उपलब्ध होणार नाही. तथापि अशाच काहीशा स्थितीत रहाणेच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियात संघाने बाजी मारली होती, हे विशेष.

भारतीय संघ ऑस्ट्रेलियातील विजयाला प्रेरणा मानून न्यूझीलंडला धडा शिकवू इच्छितो. जूनमध्ये याच न्यूझीलंडने डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात भारताच्या आशेवर पाणी फेरले होते. नवे प्रशिक्षक राहुल द्रविड हे दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी अन्य खेळाडूंना परीक्षा पाहतील. फलंदाजांमध्ये अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा आणि मयांक अग्रवाल यांनीच दहापेक्षा अधिक कसोटी सामने खेळले आहेत. अग्रवालने चांगली कामगिरी केली तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध राहुलचे पुनरागमन कठीण होईल. अनेक स्टार्सच्या अनुपस्थितीत नेतृत्व करणारा रहाणे सरावादरम्यान खंबीर जाणवला नाही. त्याच्यापुढे नेतृत्वासह फलंदाज म्हणून धावा काढण्याचे आव्हान असेल. त्याच्या कारकिर्दीचा पुढचा मार्गदेखील यातूनच निश्चित होऊ शकेल.

किवींचा समतोल संघ न्यूझीलंड संघाचे नेतृत्व शानदार फलंदाजीसाठी ओळखला जाणारा केन विलियम्सनकडे आहे. रॉस टेलर, टॉम लॅथम, हेन्री निकोल्स यांच्यासारखे मोठी खेळी करणारे फलंदाज संघात आहेत. टिम साऊदी आणि नील वॅगनर हे नवा चेंडू हाताळणार असून, फिरकीची जबाबदारी डावखुरा अयाज पटेल, मिशेल सॅंटनर आणि ऑफ स्पिनर विलियम सॉमरवीले यांच्याकडे सोपविली जाईल.  

-श्रेयस अय्यरचे पदार्पण- मुंबईचा फलंदाज श्रेयस अय्यर हा या सामन्याद्वारे कसोटी पदार्पण करेल. त्याला सूर्यकुमार यादवऐवजी प्राधान्य देण्यात आले. श्रेयसचा प्रथमश्रेणी रेकॉर्ड चांगला आहे, मात्र २०१९ पासून तो मोठे सामने खेळलेला नाही.- द्रविड यांनी सरावादरम्यान अय्यरला नील वॅगनरचा मारा कसा असेल हे डोळ्यापुढे ठेवून टिप्स दिल्या. अय्यर हा कामगिरीच्या बळावर मधल्या फळीत स्थान भक्कम करू शकतो. - वरिष्ठ गोलंदाज इशांत शर्मा याच्यासाठीही स्थिती अनुकूल नाही. नेटमध्ये तो लयमध्ये नव्हता. मोहम्मद सिराजऐवजी इशांतला संधी मिळाली तर चांगली कामगिरी करण्याचे त्याच्यावर दडपण येईल. - उमेश यादव मात्र अंतिम एकादशमध्ये असेल. फलंदाजीबाबत सांगायचे झाल्यास शुभमन गिल- मयांक अग्रवाल सलामीला येतील, पाठोपाठ  पुजारा, रहाणे आणि अय्यर असतील. जयंत यादवनेदेखील नेटमध्ये घाम गाळला; पण अक्षर पटेलवरील भार कमी करण्यासाठी तो खेळेल की नाही, हे कळू शकले नाही. अश्विन याच्यावर फिरकीची मुख्य भिस्त राहील.

फॉर्मबाबत चिंतेत नाहीविनाकारण माझ्या फॉर्मबाबत चिंता व्यक्त होत आहे. योगदान देण्याचा अर्थ प्रत्येक सामन्यात शतक ठोकणे नव्हे. ३०-४० धावांचेही योगदान मोठे असते. संघाच्या विजयात योगदान देणे महत्त्वाचे असते. आतापासून भविष्याचा विचार करणेही चांगले नाही. वर्तमानात सर्वश्रेष्ठ योगदान देण्यावर माझा भर असतो. राहुल द्रविड बलस्थाने मजबूत करण्याविषयी आणि गोष्टी सोप्या करण्याविषयी मार्गदर्शन करतात. अनेक वर्षांपासून खेळत असल्याने अधिक काळजी करण्यापेक्षा गोष्टी सोप्या करण्यावर भर द्या.    - अजिंक्य रहाणे, कर्णधार भारत

प्रतिस्पर्धी संघ -भारत अंजिक्य रहाणे (कर्णधार), मयांक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिद्धिमान साहा (यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, उमेश यादव, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, जयंत यादव, श्रीकर भरत आणि प्रसिद्ध कृष्णा.

न्यूझीलंड केन विलियमसन (कर्णधार), टॉम लैथम, रॉस टेलर, हेन्री निकोल्स, टॉम ब्लंडेल (यष्टिरक्षक), विल यंग, ग्लेन फिलिप्स, डेरिल मिशेल, टिम साउदी, नील वॅगनर, काइल जैमीसन, विलियम सोमरविले, अयाज पटेल, मिशेल सँटनर आणि रचिन रवींद्र.

फिरकीपटूंची भूमिका निर्णायक‘कसोटी मालिकेत फिरकीपटूंची भूमिका निर्णायक ठरेल.  आमचे दोन्ही फिरकी गोलंदाज अयाज पटेल व विलियम सॉमरविले यशस्वी होतील, अशी आशा आहे. अनेक संघांना भारतात फिरकीच्या आव्हानास सामोरे जावे लागते. आम्हीही अपवाद नाही.  वेगवान गोलंदाजांनाही येथे रिव्हर्स स्वींग मिळेल.  भारतीयांविरुद्ध वेगवान व फरकीचा सारखाच वापर करु. अश्विन व जडेजा यांच्याविरुद्ध यशस्वी होण्याची किमया लागेल. - केन विलियम्सन, कर्णधार न्यूझीलंड

सामना : सकाळी ९.३० पासून

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडराहूल द्रविडअजिंक्य रहाणेसूर्यकुमार अशोक यादवभारतीय क्रिकेट संघ
Open in App