Join us  

Emotional : चार दिवसांपूर्वी झालेलं वडिलांचं निधन, तरीही मैदानावर उतरून सचिननं ठोकलं शतक!

क्रिकेटप्रती असलेली एकनिष्ठता त्याला महान फलंदाज बनवते.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 11:05 AM

Open in App

महान फलंदाज सचिन तेंडुलकर यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचे शतक साजरे करण्याचा पराक्रम केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावाही त्याच्या नावावर आहेत आणि असे अनेक विक्रम जे सचिननं मोडले अन् केलेही. वन डे क्रिकेटमधील त्याच्या शतकांच्या लिस्टवर नजर टाकल्यास त्याचे 22 वे शतकाचे त्याच्या आयुष्यात एक विशेष स्थान आहे. 21 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी सचिननं ब्रिस्टल येथे खणखणीत शतक ठोकलं होतं. शतक पूर्ण केल्यानंतर सचिन आभाळाकडे बघत भावूक झाला होता... त्याला कारणही तसंच होतं. या सामन्याच्या चार दिवसांपूर्वी सचिनच्या वडिलांचे निधन झाले होते.

क्रिकेटप्रती असलेली एकनिष्ठता त्याला महान फलंदाज बनवते. 1999च्या वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारताला दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागला होता. पुढील सामना झिम्बाब्वेविरुद्ध होता आणि त्यावेळी झिम्बाब्वेचा संघ तगडा होता. पण, या सामन्यापूर्वीच सचिनसाठी वाईट बातमी आहे. त्याचे वडील रमेश तेंडुलकर यांचे निधन झाले होते. भारतीय संघासाठी हा मोठा धक्का होता. सचिनला मायदेशात परतावे लागले. सचिनशिवाय भारताला झिम्बाब्वेविरुद्धचा सामना खेळावा लागला. भारताला त्या सामन्यात तीन धावांनी पराभव पत्करावा लागला. सलग दोन सामने हरल्यानं टीम इंडियावर वर्ल्ड कप स्पर्धेबाहेर होण्याचं संकट आलं होतं. त्यानंतर पुढील सामना केनियाविरुद्ध होता. वडिलांचे अंत्यसंस्कार करून सचिन पुन्हा वर्ल्ड कप स्पर्धेसाठी परतला. 

केनियाविरुद्धच्या सामन्यात त्यानं 101 चेंडूंत 140 धावा चोपल्या. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारतानं 2 बाद 329 धावांचा डोंगर उभा केला. शतक पूर्ण केल्यानंतर सचिन आभाळाकडे पाहत होता. त्यानं बॅट उंचावून वडिलांची आठवण काढली. त्यावेळी भावुक झालेला सचिन संपूर्ण जगानं पाहिला.  या लक्ष्याचा पाठलाग करताना केनियाला 7 बाद 235 धावा करता आल्या आणि भारतानं 94 धावांनी हा सामना जिंकला. या सामन्यात सचिनला मॅन ऑफ दी मॅच म्हणून गौरविण्यात आले. भारतानं सुपर सिक्सपर्यंत मजल मारली, पण त्यापुढे जाण्यात ते अपयशी ठरले.  

टॅग्स :सचिन तेंडुलकरआयसीसीभारतकेनिया