काही महिन्यांवर आलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. मात्र या संघाची निवड करताना सलामीवर शुभमन गिल याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याने क्रिकेटप्रेमींना धक्का बसला आहे. निवड समितीने घेतलेला हा निर्णय शुभमन गिलसाठीही अनपेक्षित आणि धक्कादायक होता, अशी माहिती आता समोर येत आहे. टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी संघात निवड करण्यात येणार नसल्याची माहिती शुभमन गिल याला संघाची घोषणा करण्यापूर्वी अवघी काही मिनिटे आधीच देण्यात आल्याचा दावा एका वृत्तामधून करण्यात आला आहे.
या संदर्भात क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार शनिवारी दुपारी सुमारे २ वाजता बीसीसीआयने आपल्या कार्यालयातून टी-२० विश्वचषक आणि त्याआधी होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी संघाची घोषणा केली. तत्पूर्वी काही वेळ आधी शुभमन गिल याला फोन करून त्याला टी-२० विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या संघामधून वगळण्यात आल्याच्या निर्णयाबाबत कळवण्यात आले. मात्र ही माहिती शुभमन गिलकडे एवढी उशिरा आली की, त्याच्याकडे याबाबत काही विचार करण्यासही वेळ उरला नव्हता.
दरम्यान, टी-२० विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या संघातून वगळण्यात आल्याच्या निर्णयाबाबत कळले तेव्हा शुभमन गिल अहमदाबादहून चंडीगड येथे परतत होता. तसेच संघातून वगळण्यात आल्याची माहिती कुठल्या अधिकाऱ्याने शुभमन गिल याला दिली, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मात्र संघातून वगळण्यात आल्याचे शुभमन गिलला प्रवासादरम्यान समजले आणि संघ जाहीर होण्यापूर्वीच त्याला आपल्या संघातील स्थानाबाबत माहिती मिळाली होती, एवढं निश्चित झालं आहे.
खरंतर शुभमन गिल हा टी-२० वर्ल्डकप आणि त्याआधी होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी आपली निवड निश्चित असल्याचे मानून तयारी करत गोता. एवढंच नाही तर अहमदाबाद येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत खेळण्यासही तो इच्छूक होता. मात्र त्याला संघात स्थान मिळू शकले नव्हते.