हाँगकाँग - क्रिकेट म्हणजे भरपूर प्रसिद्धी आणि पैसा असे समिकरण तयार झाले आहे. त्यामुळेच यशस्वी क्रिकेटपटू होण्यासाठी अनेक तरुण क्रिकेटच्या मैदानात घाम गाळत असतात. 21 हे वय क्रिकेटमध्ये कारकीर्द सुरू करण्याचे वय मानले जाते. मात्र एका क्रिकेटपटूने आपले दुसरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी चक्क वयाच्या 21 व्या वर्षीच क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे. खरंतर पहिल्याप्रथम यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पण हाँगकाँगचा यष्टीरक्षक/फलंदाज ख्रिस्टोफर कॉर्टर याने पायलट बनण्याचे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.
अवघ्या 21 वर्षांच्या ख्रिस्टोफर याने आतापर्यंत 11 एकदिवसीय आणि 10 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर क्वार्टर आता अॅडलेडला रवाना होणार आहे. तिथे द्वितीय श्रेण वर्गातील अधिकारी बनण्यासाठी तो 55 आठवड्यांचे प्रशिक्षण घेणार आहे.
दरम्यान, ख्रिस्टोफर क्वार्टरच्या निवृत्तीबाबत
आयसीसीने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून माहिती दिली आहे. "मी क्रिकेट खेळण्यासाठी माझ्या अभ्यासाला आधीच अर्धविराम दिलेला आहे. मला वाटते आताची वेळ ही मला जे काही करायचे आहे त्यासाठी योग्य आहे, असे मला वाटते. मला आता पायलट व्हायचे आहे." असे ख्रिस्टोफर याने सांगितले.
21 वर्षीय ख्रिस्टोफर याने 16 नोव्हेंबर 2017 रोजी दुबई येथे यूएईविरुद्घ आपला पहिला एकदिवसीय सामना खेळला होता. तर 21 नोव्हेबर 2017 रोजी त्याने आबुधाबी येथे ओमानविरुद्ध झालेल्या लढतीमधून
टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. नुकत्याच आटोपलेल्या आशिया चषक स्पर्धेतही त्याने हाँगकाँगचे प्रतिनिधित्व केले होते.