कसोटी आणि एकदिवसीय मालिकेनंतर भारतीय संघ सध्या घरच्या मैदानात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत व्यग्र आहे. १९ डिसेंबरला अहमदाबादच्या मैदानात या मालिकेतील शेवटचा सामना खेळल्यावर भारतीय संघ थेट नव्या वर्षात ११ जानेवारीला पुन्हा मैदानात उतरेल. पण तीन आठवड्यांच्या सुट्टीच्या काळातही सर्व वरिष्ठ खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळावे लागणार आहे. बीसीसीआयने यासंदर्भात ठाम भूमिका घेतल्याचे समोर येत आहे. त्यामुळे फक्त रोहित शर्मा आणि विराट कोहलीच नव्हे तर कसोटी आणि वनडे संघाचा नवा कर्णधार शुभमन गिलसह टी-२० कर्णधार यांना सुट्टीचा आनंद न घेता देशांतर्गत क्रिकेटमध्ये ड्युटीवर जावे लागणार आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
हा नियम काही फक्त विराट-रोहितसाठी नाही; तर...
भारतीय संघातील दोन अनुभवी फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये फक्त वनडेत सक्रीय आहेत. या दोघांनाही देशांतर्गत क्रिकेटमधील एकदिवसीय प्रकारात रंगणाऱ्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत मैदानात उतरावे लागणार आहे. टीम इंडियातील निवडीसाठी देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत खेळण्याचा हा नियम फक्त या दोघांसाठी नाही. व्हाइट बॉल क्रिकेटमधील सर्व सक्रीय खेळाडूंसाठी बीसीसीआयनं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत खेळणं सक्ती केले आहे. त्यामुळे शुभमन गिल, सूर्यकुमार यादव आणि केएल राहुलसह जसप्रीत बुमराहसारख्या अनुभवी खेळाडूंनाही या स्पर्धेत भाग घ्यावा लागणार आहे.
काऊंटडाऊन सुरू, उरले १०३ दिवस! वैभव सुर्यवंशीला टीम इंडियात येण्यापासून कोणी रोखू शकणार नाही... कसे...
टीम इंडियातील वरिष्ठ खेळाडूंना किती सामने खेळावे लागणार?
बीसीसीआयने यासंदर्भात आपली भूमिका अधिकृतरित्या स्पष्ट केलेली नाही. जी माहिती समोर येत आहे त्यानुसार, सर्व वरिष्ठ खेळाडूंनी आगामी विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत किमान दोन सामन्यासाठी उपलब्ध राहावे लागणार आहे. यावर बीसीसीआय ठाम असल्याचे समजते.
कधीपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेचा थरार?
देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेतील वनडे फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येणारी विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ स्पर्धेतील यंदाच्या हंगामाची सुरुवात ही २४ डिसेंबरपासून होणार आहे. १८ जानेवारीला या स्पर्धेतील अंतिम सामना खेळवण्यात येईल. विराट कोहली या स्पर्धेत दिल्लीच्या तर रोहित शर्मा मुंबईच्या संघातून खेळताना दिसेल. ही जोडी किती सामने खेळणार ते अजून तरी गुलदस्त्यातच आहे.