पुणे : कारकिर्दीच्या निरोपाचा आंतरराष्ट्रीय सामना खेळायला मिळाला नाही, याची खंत मला अजिबातही नाही. देशाला जिंकून देण्याचा मानंद माझ्या दृष्टीने शब्दांत व्यक्त करण्यापलिकडचा आहे आणि मी तो पूरेपूर लुटला.माझ्या कारकिर्दीवर मी समाधानी आहे, अशा शब्दांत अलीकडे क्रिकेटमधून निवृत्ती पत्करणारा माजी सलामीवीर गौतम गंभीर याने आपल्या भावना मंगळवारी पुण्यात व्यक्त केल्या.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित एका क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन गंभीरच्या हस्ते झाले. यानानंतर गंभीरने पत्रकारांशी बोलताना क्रिकेटशी संबंधित अनेक विषयांवर आपली मते मांडली. कारकिर्दीतील मोठ्या आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता खेळाडूंमध्ये छोट्या स्पर्धांमधूनच निर्माण होते. यामुळे क्रिकेट खेळायला प्रारंभ केल्यानंतरच्या काळातील छोट्या स्पर्धा महत्वपूर्ण असतात, असे त्याने आवर्जून नमूद केले.
ग्रामीण भागातही रूजतेय क्रीडासंस्कृती
गंभीर म्हणला, ‘‘लहान गावांमध्ये होणाऱ्या स्पर्धांमुळे खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्याची संधी अनेकदा मिळते. शिवाय आता ग्रामीण भागातही खेळाच्या पायाभूत सुविधा पोहोचल्या आहेत. यामुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चमकदार कामगिरी करणारे अनेक खेळाडू छोट्या गावांतून पुढ येत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर शहरी खेळाडूंचा असलेला भरणा हे गेल्या १५-२० वर्षांतील चित्र आता मागे पडले आहे. ग्रामीण भागात क्रीडा संस्कृती रूजत असल्याने या भागातील खेळाडूही आंतरराष्ट्रीय पातळीवर सातत्याने चमकत आहेत.’’
समाजाचं देणं फेडणं हे आपलं कर्तव्य
समाजाने आणि देशाने आपल्याला खूप काही दिले आहे. प्रत्येक जण आपल्या परीने त्याची पतरफेड करतो. मीदेखील अशी संधी शोधत असतो. तृतीयपंथियांसाठी करीत असलेले काम हे माझ्या दृष्टीने सामाजिक ऋण फेडण्यासाठीचा प्रयत्न आहे. भारताचे प्रतिनिधित्व करताना देशवासियांनी माझ्यावर भरभरून प्रेम केले. या खेळामुळे मला मान-सन्मान, लोकप्रियता, पैसा सर्व काही दिले. याची पतरफेड करणे हे मी कर्तव्य समजतो. ज्या समाजाने, देशाने आपल्याला घडविले, त्याचे आपणही काही तरी देणं लागतो. या भावनेतून केलेली समाजसेवा मानसिक समाधान देणारी असते, असे विचार गंभीरने व्यक्त केले.
महिला क्रिकेटच्या लोकप्रियतेत वाढ
१० वर्षांपूर्वीचे आणि आताचे महिला क्रिकेट यांच्यात तुलना केली असता, महिला क्रिकेटच्या लोकप्रियतेत होत असलेली वाढ अधोरेखित होते. अलिकडच्या काळात महिला क्रिकेटचे महत्व लक्षणीयरित्या वाढले आहे. नुकत्याच झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिलांनी दमदार कामगिरी देशवासियांना आपली दखल घ्यायला भाग पाडले. याला कारणीभूत आहे ती आपल्या खेळाडूंची कामगिरी. त्या पुरूष खेळाडूंप्रमाणे दमदार कामगिरी करीत असल्याने बीसीसीआय, माध्यमे तसेच क्रिकेटशौकिन त्यांची दखल घेत आहे, असे गंभीर म्हणाला.
बच्चे कंपनीकडून गार्ड ऑफ ऑनर!
टीम इंडियाला २००७ मध्ये टी-२० आणि २०११ मध्ये एकदिवसीय प्रकारामध्ये विश्वविजेतेपद मिळवून देण्यात मोलाचे योगदान देणारा गंभीर दोनच दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. आज त्याचे पुण्यात जल्लोषात स्वागत झाले. तो मैदानावर येताच उपस्थित शाळकरी मुले, क्रिकेटपटू आणि क्रिकेटशौकिनांंनी गौती...गौती... या त्याच्या टोपणनावाने जोरदार जल्लोष केला. बच्चे कंपनीने रांगेत उभे राहून बॅट उंचावून त्याला मानवंदना दिली. या ‘गार्ड ऑफ ऑनर’मुळे आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला गंभीर भारावला होता.