Join us

चॅम्पियन्स ट्रॉफी: "तो कितीही चांगला खेळला तरी त्याला संघात जागा मिळेल असं वाटत नाही..."

तुफान फॉर्मात असलेल्या स्टार क्रिकेटरबाबत दिनेश कार्तिकची मोठी भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 14:53 IST

Open in App

Dinesh Karthik Team India, Champions Trophy 2025: मिनी वर्ल्ड कप म्हणून नावलौकिक असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला १९ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेत भारताला २० तारखेला बांगलादेश विरुद्ध, २३ तारखेला पाकिस्तान विरुद्ध तर दोन मार्चला न्यूझीलंड विरुद्ध सामने खेळायचे आहेत. गेल्या काही महिन्यांमधील भारतीय संघातील खेळाडूंच्या खराब कामगिरीमुळे साऱ्यांचेच लक्ष आता चॅम्पियन्स ट्रॉफी कडे लागले आहे. काही खेळाडूंच्या दुखापती आणि काही खेळाडूंचे खराब फॉर्म यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी मधील भारताच्या अडचणी किती वाढतात याबाबतही चर्चा सुरू झाली आहे. असे असतानाच भारताचा माजी यष्टीरक्षक दिनेश कार्तिक याने एक भविष्यवाणी केली आहे. करूण नायर (Karun Nair), मयंक अग्रवाल, समीर रिझवी सारखे अनेक खेळाडू आपली प्रतिभा दाखवत आहेत. त्यापैकीच भारताचा एक खेळाडू सध्या तुफान फॉर्मात असूनही त्याला चॅम्पियन्स ट्रॉफी साठी संघात संधी मिळू शकणार नाही, असा दावा कार्तिकने केला आहे.

कोण आहे 'हा' खेळाडू?

सध्या भारताच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील एका दमदार खेळाडू बाबत दिनेश कार्तिकने ही भविष्यवाणी केली आहे. भारतीय फलंदाज करूण नायर गेल्या काही सामन्यात अतिप्रचंड वेगाने धावा करताना दिसत आहे. त्याने आत्तापर्यंत सलग चार शतके ठोकण्याचा विक्रमही करून दाखवला आहे. पण असे असूनही त्याला चॅम्पियन्स ट्रॉफी च्या भारतीय संघात स्थान मिळणे कठीण आहे, असा दावा दिनेश कार्तिकने केला आहे. यामागचे कारणही त्याने सांगितले आहे.

दिनेश कार्तिकने सांगितले कारण

दिनेश कार्तिक म्हणाला, "करूण नायर हा सध्या खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. त्याच्या खेळण्याची पद्धत इतर कोणापेक्षाही खूप जास्त चांगली दिसत आहे. केवळ करूण नायरच नाही तर मयंक अगरवाल हा देखील चांगली खेळी करताना दिसत आहे. या दोघांचा फॉर्म खूप चांगला असूनही त्यांना आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी साठी भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्यता कमीच आहे. याचे कारण असे की भारताचा वनडे साठीचा संघाचा सेट जवळपास निश्चित आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघ व्यवस्थापन संघात फारसा बदल करू इच्छित नसेल."

"करूण नायरचा सध्याचा फॉर्म पाहता त्याला संघात घेण्याचा मोह होण्यात काहीच गैर नाही. त्याने आपल्या खेळीतून स्वतःची एक जागा नक्कीच बनवली आहे. पण मला वाटत नाही की चॅम्पियन ट्रॉफी च्या संघासाठी त्याचा विचार केला जाईल. तसे असले तरी क्रिकेटमध्ये काहीच निश्चित नसते. त्यामुळे तो अशाच पद्धतीने खेळत राहिला तर कदाचित त्याचा भविष्यात विचार केला जाऊ शकेल. कारण त्याच्या सध्याच्या खेळीवर सारेच खुश आहेत", असाही एक अंदाज दिनेश कार्तिकने व्यक्त केला.

 

टॅग्स :चॅम्पियन्स ट्रॉफीदिनेश कार्तिकमयांक अग्रवालभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघ