Virat Kohli Fined For Sam Konstas Incident : भारतीय संघाचा स्टार बॅटर विराट कोहलीवर ICC नं दंडात्मक कारवाई केली आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळवण्यात येत आहे. बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्या दिवशी विराट कोहलीनं ऑस्ट्रेलियाच्या युवा सलामीवीराला खांद्याने धक्का मारल्याचा सीन पाहायला मिळाला होता. या प्रकरणात आयसीसीने त्याच्यावर कारवाई केलीये. किंग कोहलीला या प्रकरणात एका सामन्याच्या बंदीची मोठी शिक्षा होतीये की, काय असं वाटतं होते. पण २० टक्के मॅच फी आणि एक डिमेरिट पॉइंट्सह हे प्रकरण किंग कोहलीच्या दृष्टीने अगदी स्वस्तात आटोपलं आहे.
अन् किंग कोहलीनं कडक फटकेबाजी करणाऱ्या युवा खेळाडूला धक्का
बॉक्सिंग डे कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. १९ वर्षीय युवा सलामीवीर सॅम कोन्स्टास (Sam Konstas) याने संघाच्या डावाची सुरुवात केली. पहिल्या १८ चेंडूत एकदम शांत अंदाजात खेळणाऱ्या सॅमनं काही वेळातच गियर बदलला. कडक अंदाजात फटकेबाजी करताना त्याने बुमराहलाच टार्गेट केल्याचे पाहायला मिळाले.
१९ वर्षांच्या पोरानं भारतीय गोलंदाजांचे खांदे पाडल्यावर ऑस्ट्रेलियाच्या डावातील दहाव्या षटकाच्या समाप्तीनंतर विराट कोहलीनं त्याला खांदा मारत धक्का दिला. यावर या युवा ऑस्ट्रेलियन फलंदाजानेही शाब्दिक पलटवार केला. मैदानातील पंच आणि उस्मान ख्वाजा यांनी हा वाद मिटवल्याचे पाहायला मिळाले होते. त्याची ही कृती आयसीसीच्या आचारसंहितेचा भंग करणारी ठरली. या प्रकरणात त्याच्यावर दंडात्मक कारवाई झाली आहे. स्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगसह भारताचा माजी कोच आणि समालोचक रवी शास्त्री यांनीही कोहलीची ही गोष्ट खटकणारी असल्याचे बोलून दाखवले होते.
काय सांगतो नियम?
क्रिकेटच्या MCC नियम ४२.३.१ नुसार, मैदानात प्रतिस्पर्धी किंवा अन्य खेळाडूशी जाणीवपूर्वक धक्काबुक्कीसारखा फिजिकली प्रकार करणे हा लेवल २ गुन्हा मानला जातो. यात ५०-१०० टक्के दंड किंवा एक सस्पेंशन पॉइंट आणि तीन डिमेरिट पॉइंट किंवा १०० टक्के दंड आणि सस्पेन्शन पॉइंट्सच्या बरोबरीचे चार डिमेरिट पॉइंट अशी कारवाईची तरतूद आहे.