Join us

टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!

शतकी खेळीनंतर काय म्हणाला पृथ्वी शॉ? जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 14:29 IST

Open in App

Prithvi Shaw No Sympathy Statement : बुची बाबू स्पर्धेत दमदार शतक ठोकत मुंबईकर पृथ्वी शॉनं महाराष्ट्र संघाकडून धमाकेदार पदार्पण केले आहे. छत्तीसगड विरुद्धच्या सामन्यातील क्लास खेळीनंतर त्याने दिलेली प्रतिक्रियाही आता लक्षवेधी ठरतीये. कारकिर्दीत चढ-उताराचा सामना केल्यावर पुन्हा शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी मेहनत घेत असून याचे फळ मिळेल, असा विश्वासही त्याने व्यक्त केलाय. एवढेच नाही तर मला सहानुभूती नकोय, म्हणत त्याने पडत्या काळात टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांनी साथ न दिल्याची मनातली गोष्टही बोलून दाखवलीये. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

महाराष्ट्र संघानं जेवढ्या धावा केल्या त्यातील निम्म्या धावा पृथ्वीनंच केल्या

 बुची बाबू स्पर्धेत छत्तीसगडच्या संघाने पहिल्या डावात २५२ धावा केल्यावर महाराष्ट्र संघ २१७ धावांत आटोपला. यात निम्म्यापेक्षा अधिक धावा या पृथ्वी श़ॉनं काढल्या. १४१ चेंडूचा सामना करताना त्याने १११ धावांची उपयुक्त खेळी केली. या कामगिरीसह २५ वर्षीय युवा बॅटरनं "फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज पर्मनंट" याची एक झलकच दाखवून दिलीये.

सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...

शतकी खेळीनंतर काय म्हणाला पृथ्वी शॉ?

मुंबईची साथ सोडून महाराष्ट्र संघाच्या ताफ्यातून पदार्पणात शतक झळकवल्यावर पृथ्वी म्हणाला  की, "पुन्हा शून्यापासून सुरुवात करण्यास मनात कोणताही संकोच बाळगत नाही. आयुष्यात मी खूप चढ-उतार पाहिले आहेत. स्वत:वर आणि मी करत असलेल्या मेहनतीवर विश्वास आहे. यंदाचा हंगाम माझ्यासह टीमसाठी सर्वोत्तम असेल", अशा शब्दांत त्याने क्रिकेटच्या मैदानात पुन्हा धमक दाखवण्यासाठी तयार असल्याचे म्हटले आहे.

मला सहानुभूती नकोय!

शतकी खेळीनंतर टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांनी अभिनंदन करण्यासाठी  कॉल वैगेरे  केला  का? असा प्रश्नही पृथ्वी शॉला विचारण्यात आला होता. यावर नाही, असे उत्तर देत तो म्हणाला की, मला कुणाची सहानुभूती नकोय. कटुंबियांसह मित्र परिवार माझ्यासोबत आहे. ज्यावेळी मी मानसिकरित्या खचलो होतो, त्यावेळीही ते माझ्या सोबत होते. सोशल मीडियावरील माहोल खराब आहे, त्यामुळे या माध्यमापासून दूरावाच बरा, असेही तो म्हणाला आहे. पृथ्वीचं हे वक्तव्य संघर्षाच्या काळात टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणीही त्याच्या पाठीशी उभे राहिले नाही, ही गोष्ट उघड करणारे आहे.

टॅग्स :पृथ्वी शॉभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघ