Nicholas Pooran, Mumbai Indians: वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचा फलंदाज निकोलस पूरनने वयाच्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करून क्रिकेट जगताला मोठा धक्का दिला. पूरनने सोशल मीडियाद्वारे ही घोषणा केली. वयाच्या इतक्या लवकर हा निर्णय खूप कठीण असल्याचे त्याने म्हटले. पूरनने वेस्ट इंडिजसाठी ६१ एकदिवसीय आणि १०६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले. एकूण १६७ आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या पूरनने ४००० हून अधिक धावा केल्या. तो उत्तम फॉर्मात असताना त्याने तडकाफडकी निवृत्ती स्वीकारली. त्यामुळे या निर्णयामागचे कारण काय, याची चर्चा रंगली आहे. असे असतानाच त्याला एका वेगळ्याच संघाचा कर्णधार बनवल्याची बातमी समोर आली आहे.
पूरन आता मुंबई इंडियन्स न्यू यॉर्क संघाचा कर्णधार
IPL 2025 मध्ये लखनौ सुपर जायंट्सकडून खेळलेल्या निकोलस पूरनला MLC म्हणजेच मेजर लीग क्रिकेटमध्ये मुंबई इंडियन्स न्यू यॉर्कचा कर्णधार बनवण्यात आले आहे. निकोलस पूरन मुंबई इंडियन्स न्यू यॉर्ककडून याआधी MLC मध्ये २०२३ आणि २०२४ चा हंगाम खेळला. पण आता तो MLC 2025 मध्ये पहिल्यांदाच MI NY चे नेतृत्व करताना दिसणार आहे. एमआय न्यू यॉर्कने त्याला किरॉन पोलार्डच्या जागी नवीन कर्णधार म्हणून नेमले आहे.
फायनलच्या सामन्यात १३७ धावांची खेळी
निकोलस पूरनने गेल्या २ हंगामात एमआय न्यू यॉर्कसाठी १५ सामने खेळले आहेत. त्या सामन्यांमध्ये पूरनने १ शतक आणि ३ अर्धशतकांसह ५६८ धावा केल्या आहेत. त्याने एकूण ३९ षटकार आणि ३८ चौकार ठोकले आहेत. पूरनसाठी २०२३ चा हंगाम खास होता. तिथे तो सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. त्या हंगामात त्याने तब्बल ३४ षटकारही मारले. MLC 2023 चा अंतिम सामना एमआय न्यू यॉर्कने जिंकला होता. त्यात निकोलस पूरनने ५५ चेंडूत २४९ पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने १३७ धावा केल्या होत्या. त्याच्या धमाकेदार खेळीत १० चौकार आणि १३ षटकारांचा समावेश होता.
Web Title: nicholas pooran new captain mumbai indians mi newyork mlc 2025 after retirement international cricket
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.