न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज मार्टिन गुप्टिल याने बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकटमधून निवृत्ती जाहीर केली. पण त्याचवेळी, त्याने जगभरातील टी-२० लीगमध्ये खेळणार असल्याचेही स्पष्ट केले. गुप्टिलने २०२२ मध्ये न्यूझीलंडकडून अखेरचा सामना खेळला होता. यंदाच्या सत्रात तो सुपर स्मॅश स्पर्धेत ऑकलैंड एसेस संघाचे कर्णधारपद सांभाळत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
स्वतःला नशीबवान मानतो; निवृत्तीवर काय म्हणाला मार्टिन गुप्टिल?
न्यूझीलंड क्रिकेटद्वारा प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकाद्वारे गुप्टिलने म्हटले की, 'लहानपणापासून माझे न्यूझीलंडकडून खेळण्याचे स्वप्न होते. मी देशासाठी ३६७ सामने खेळलो, यासाठी स्वतःला नशीबवान मानतो. या कामगिरीचा मला खूप अभिमान आहे. माझ्या कारकीर्दीदरम्यान मी अनेक शानदार खेळाडूंसह खेळलो आणि या आठवणी कायम माझ्यासोबत राहतील.'
विश्वचषक स्पर्धेत 'द्विशतक' झळकवण्याचा रेकॉर्ड, अशी राहिली कारकिर्द
गुप्टिलने ४७ कसोटी सामने खेळले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने १९८ सामने खेळताना १८ शतके आणि ३९ अर्धशतकांसह ७,३४६ धावा काढल्या आहेत. गुप्टिलने १२२ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांमध्ये दोन शतकांसह २० अर्धशतक झळकावत ३,५३१ धावा काढल्या. एकदिवसीय पदार्पणात शतक झळकावणारा गुप्टिल पहिला किवी फलंदाज ठरला, तसेच त्याने २०१५ सालच्या विश्वचषक स्पर्धेत द्विशतकही झळकावले होते.