Join us

माझी रणनिती स्पष्ट होती, व्यंकटेश ‘फिनिशर’ची भूमिका बजावेल : राहुल द्रविड

वेस्ट इंडिजविरुद्ध टी-२० मालिकेत व्यंकटेश अय्यर याने स्वत:च्या कामगिरीमुळे सर्वांना प्रभावित केले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 06:28 IST

Open in App

लखनौ : वेस्ट इंडिजविरुद्ध टी-२० मालिकेत व्यंकटेश अय्यर याने स्वत:च्या कामगिरीमुळे सर्वांना प्रभावित केले. फिनिशर या नात्याने त्याने धडाकेबाज फटकेबाजीही केली. मुख्य कोच राहुल द्रविड हे व्यंकटेशच्या कामगिरीवर खूश आहेत. ते म्हणतात, ‘व्यंकटेशबाबत माझी रणनीती स्पष्ट होती. तो फिनिशरचीच भूूमिका बजावेल.’

व्यंकटेशला मधली फळी बलाढ्य करण्यासाठी संघात स्थान देण्यात आले होते. त्याने या भूमिकेला न्याय दिला. पाचव्या स्थानावर त्याने फटकेबाजी केली. तीन सामन्यांत त्याने ९२ धावांचे योगदान दिले. त्यात २४ आणि ३५ धावांची नाबाद खेळी होती.  अखेरच्या टी-२० लढतीत त्याने दोन गडी बाद केले. यामुळे हा खेळाडू संघात उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूची भूमिका बजावू शकतो हे सिद्ध झाले आहे.

व्यंकटेश आयपीएलमध्ये केकेआरकडून सलामीला खेळतो. भारतीय संघात मात्र त्याला फिनिशरची जबाबदारी सोपविण्यात आली. यासंदर्भात द्रविड म्हणाले, ‘आयपीएलमध्ये व्यंकटेश त्याच्या संघासाठी सलामीवीर असल्याची मला जाणीव आहे.  भारतीय संघातील त्याच्या भूमिकेबाबत मी स्पष्ट आहे.  आघाडीच्या तीन फलंदाजांचे स्थान मोकळे नाहीच. सुरुवातीच्या तीन स्थानांवर अनुभवी खेळाडूंनी स्वत:ला सिद्ध केले आहे.  यामुळे आम्ही व्यंकटेशला फिनिशर म्हणून निवडले.  तळाच्या स्थानावर देखीेल प्रत्येकवेळी तो यशस्वी झाला आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून व्यंकटेश आता पुढे येत आहे.’

टॅग्स :राहुल द्रविडवेंकटेश अय्यरभारतीय क्रिकेट संघ
Open in App