अहमदाबाद : गोलंदाजांनी केलेल्या टिच्चून माऱ्याच्या जोरावर बडोदा संघाला माफक धावसंख्येत रोखल्यानंतर तामिळनाडूने नियोजनात्मक फलंदाजी करत दिमाखात ७ गड्यांनी विजय मिळवला. यासह तामिळनाडूने यंदाच्या सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरले. तामिळनाडूने स्पर्धेच्या इतिहासात दुसऱ्यांदा जेतेपदाचा मान मिळवला.
मोटेरा येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये नाणेफेक जिंकून बडोदा संघाला २० षटकांत ९ बाद १२० धावांत रोखल्यानंतर तामिळनाडूने १८ षटकांत ३ फलंदाजांच्या मोबदल्यात १२३ धावा काढून जेतेपद निश्चित केले. मनिमरन सिद्धार्थ याने २० धावांत ४ बळी घेत बडोद्याचे कंबरडे मोडले. माफक धावसंख्येचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या तामिळनाडूकडून सलामीवीर सी. हरी निशांत याने ३८ चेंडूंत ३५ धावांची संयमी खेळी करत एक बाजून लावून धरली. एन. जगदीशन याने अपेक्षित आक्रमक फटकेबाजी करताना तामिळनाडूला वेगवान सुरुवात करुन दिली. मात्र .तो १२ चेंडूंत ३ चौकारांसह १४ धावा काढून परतला. अनुभवी बाबा अपराजितने ३५ चेंडूंत नाबाद २९ धावांची खेळी केली. कर्णधार दिनेश कार्तिकनेही १६ चेंडूंत २२ धावांचे योगदान दिले. शाहरुख खानने ७ चेंडूंत २ चौकार व एका षटकारासह नाबाद १८ धावा काढत संघाच्या जेतेपदावर शिक्का मारला.
त्याआधी, तामिळनाडूच्या अचूक माऱ्यापुढे बडोद्याचे फलंदाज अडखळले. विष्णू सोळंकी याने ४९ धावा करत एकाकी झुंज दिली. त्याचा अपवाद वगळता इतर सर्व प्रमुख फलंदाज अपयशी ठरले. तळाच्या फळीतील अतित शेठ याने ३० चेंडूंत २९ आणि भार्गव भट्ट याने ५ चेंडूंत नाबाद १२ धावांचा तडाखा दिल्याने बडोद्याला शंभरीचा पल्ला पार करता आला. सिद्धार्थने ४ बळी घेत बडोद्याच्या फलंदाजीला खिंडार पाडले.
संक्षिप्त धावफलक
बडोदा : २० षटकांत ९ बाद १२० धावा (विष्णू सोळंकी ४९, अतित शेठ २९, केदार देवधर १६, भार्गव भट्ट नाबाद १२; मनिमरन सिद्धार्थ ४/२०.) पराभूत वि. तामिळनाडू : १८ षटकांत ३ बाद १२३ धावा (सी. हरी निशांत ३५, बाबा अपराजित नाबाद २९, दिनेश कार्तिक २२, शाहरुख खान नाबाद १८; अतित शेठ १/२०, बाबाशफि पठाण १/२३, लुकमन मेरिवाला १/३४.)